Top Newsराजकारण

पुढील २५ वर्षे राजकारणातच राहणार; संन्यास घेण्याच्या विधानानंतर फडणवीसांची सारवासारव

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनात राजकीय संन्यास घेण्याबाबत एक विधान केलं होतं. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोलेही लगावले होते. तोच मुद्दा आज पत्रकारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्यावेळी पुढील २५ वर्षे तरी राजकारणात राहणार असल्याचं सांगत फडणवीस यांनी आपल्या राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन २६ जून रोजी भाजपनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

या पुढे मी २५ वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे की, संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही. कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाहीये. विचारपूर्वक बोललो. जे करता येण्यासारखं आहे ते करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो. आणि हे खरचं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. माझी गरज आहे, त्यांची गरज आहे. यांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं. राजकारणात पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजे. ठिक आहे. त्यांच्या शुभेच्छा समजूया, असं फडणवीस म्हणाले.

सरकारकडून लोकशाहीला कुलूप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम केलं गेलं आहे. लोकशाहीच्या सगळ्या प्रथा, परंपरा, पांयडे पायदळी तुडवून उद्याच काही बिल मांडण्यात येणार आहेत. तर, परवा पुरवण्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये उल्लेख नसेल तर त्यावर बोलता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. दूध दर १५ रुपयांवर गेलेला आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे. धानाचा प्रश्न गंभीर आहे, असे अनेक मुद्दे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच विधानसभेचा अध्यक्षपद निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर साशंकता व्यक्त केली. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

सरकारचा अधिवेशनातून पळ

आम्हाला जेवढे प्रश्न सभागृहात मांडता येईल तेवढे मांडूच. पण सभागृहात प्रश्न मांडता येत नसेल तर आम्ही माध्यमांसमोर येऊन प्रश्न मांडू. रस्त्यावर उतरू, जनतेच्या फोरममध्ये जाऊ आणि प्रश्न लावून धरू. उद्या जर आंदोलन झालं, तर आंदोलन करतोय म्हणून आम्हाला बोलू नका, असंही ते म्हणाले. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button