
रात्रीचे आठ वाजले आहेत. उधोजीराजे नुकतेच दिल्लीचा दौरा आटोपून घरी परतले आहेत. आपल्या दिवाणखान्यात सौं. सोबत बसून ते चहाचा आस्वाद घेत त्यांना दिल्ली दौऱ्याची हकीकत सांगत आहेत. अचानक बाळराजे प्रवेश करतात आणि उधोजीराजेंच्या पाया पडतात.
उधोजीराजे – (आश्चर्याने) अरे , दिल्लीत तर आज सूर्य पूर्वेकडून उगवला होता, इथे पश्चिमेकडून उगवला होता की काय ? तू आणि रात्री आठला घरात ? आणि चक्क पाया पडलास माझ्या ?
बाळराजे – कम ऑन डॅड , ते फालतूचं टाँटींग सोडा. मम्मीने सकाळीच वॉर्न केलं होतं, ‘की डॅडी तीर्थयात्रेला गेले आहेत, रात्री लवकर यायचं आणि आल्या आल्या त्यांच्या पायावर बेंड व्हायचं.’ असे एकदम अचानक कुठे गेला होतात ?
उधोजीराजे – (मिश्कीलपणे) पंढरीला.
बाळराजे – (गोंधळून) पंढरीला , मम्मी तर दिल्लीला गेले म्हणून सांगत होती ?
उधोजीराजे – ( हताशपणे)अरे, तीच आमची पंढरी.
बाळराजे – (परत गोंधळून) तुम्ही काय बोलताय ते कळतंच नाहीये मला, ते जाऊ द्या ; पण तिथे गर्दी तर नव्हती ना दर्शनाला ?
उधोजीराजे – तशी काही माणसं मागे लागली होती सोबत यायला, पण मारली टांग त्यांना. फक्त दोघांनाच नेलं होतं सोबत आणि त्यांनाही बाहेरच बसवून मी एकटाच गेलो होतो गाभाऱ्यात.
बाळराजे – यु आर ग्रेट डॅड. म्हणजे अगदी व्यवस्थित दर्शन झालं असेल नाही ?
उधोजीराजे – दर्शन तर अगदी व्यवस्थित झालं , आता देवबाप्पा पावतो की नाही ते बघायचं.
बाळराजे – (निरागसपणे) देवबाप्पाला प्रसाद चांगला चढवला ना की तो पावतो म्हणे !
उधोजीराजे – मी तर डायरेक्ट फिफ्टी फिफ्टीची ऑफर देऊन आलो आहे !
बाळराजे – (परत गोंधळून) तुम्ही काय बोलताय ते कळतंच नाहीये मला, ते जाऊ द्या ; पण असं अचानक आणि घाईघाईने का गेलात ?
उधोजीराजे – अरे, राजकारणात जेव्हा आपला मित्रच आपल्या शत्रूपक्षाला सामील होऊन आपल्या जीवावर उठणार असतो ; तेव्हा त्याच्या आधी आपणच डाव साधायचा असतो. यालाच राजकारण म्हणतात.
बाळराजे – (नेहमी सारखं गोंधळून) हे फारच कॉम्प्लिकेटेड होतंय हो डॅड , थोडया इझी टर्ममध्ये नाही का सांगता येणार ?
उधोजीराजे – (विजयी हास्य करीत) नहले पे दहला !
०००००
सकाळचे आठ वाजले आहेत. देवानाना नागपूरकर आपल्या दिवाणखान्यात दै. पुण्यनगरीतील ‘ खाली सलाम दुवा मुलाकात में’ हा उधोजीराजेंच्या दिल्ली दौऱ्यावर लिहिलेला खुसखुशीत लेख वाचून गालातल्या गालात हसत आहेत, तोच त्यांच्या मोबाईलमधून ‘ जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे, हम वो है जो दो और दो पांच बना दे ‘ गाण्याची रिंगटोन वाजते. कॉल उचलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जास्तच रुंद होतं.
देवानाना – गुड मॉर्निंग. बोला साहेब. काय हुकूम ?
साहेब – (वैतागत) – आता आम्ही काय हुकूम करणार ? हुकुमाची पानं तर उधोजींच्या हातात गेलेली दिसतात. आता आम्ही जोकर ठरतो की काय असं वाटायला लागलं आहे.
देवानाना – ( आत्मविश्वासाने) साहेब , आपण दोघं एकत्र आल्यावर, अशी कशी जातील हो हुकुमाची पानं दुसऱ्या कोणाच्या हातात ? डाव जिंकायचा असेल तर तीन एक्के आधीच बाहेर काढून मगच पत्ते समोरच्याच्या हातात द्यायचे असतात ,हे कळतं ना मला. पिसत बस म्हणावं हवे तसे पत्ते !
साहेब – (अस्वस्थपणे) ते ठीक आहे हो, पण चक्क अर्धा तास एकांतात भेट म्हणजे काय?
देवानाना – (मिश्कीलपणे) म्हणजे काही नाही. कितीही मोठी संख्या गुणिले शून्य म्हणजे काय ? साहेब, ही फक्त इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. मागच्या इलेक्शनच्या आधी नव्हती का झाली एकांतात भेट ?
साहेब – ते सर्व ठीक आहे, पण एकांतात काय बोलणं झालं ते कळायला हवं.
देवानाना – शब्दनशब्द कळेल ना. शब्दनशब्द कळेल. ऐकायचं आहे ?
साहेब – (आश्चर्याने) तुम्हाला कसं कळलं ?
देवानाना – (दबक्या आवाजात) भेटीची स्क्रीप्ट दिल्लीश्वरांनी माझ्याकडूनच लिहून घेतली होती !
साहेब – (अवाक होत) आता काय म्हणावं तुम्हाला ?
देवानाना – (शांतपणे) नहले पे दहला !




