मुक्तपीठ

उधोजीराजेंच्या डायरीतील एक पान

- मुकुंद परदेशी

डायरी उघडून दिसेल त्या पानावर लिहितोय. मी तरी काय करू , हल्ली तारीख, वार, महिना सगळंच विसरायला होतंय. किंबहुना मी तर म्हणतो की त्याची काही गरजच पडत नाही. शोलेत तो अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे ना, ‘मुझे तो सारे पुलिसवालों की शकल एक जैसी नजर आती हैं.’ तसंच झालंय. मावळलेला आणि उगवलेला दिवस दोन्ही सारखेच दिसतात. किंबहुना आजचा दिवसही कालच्या सारखाच उगवायचा होता तर कालचा दिवस मावळलाच का, असा प्रश्न पडतो. असू द्या. आपण आपले हात वारंवार धुवावेत, मास्क लावावा आणि अंतर राखावं.

आजही कालच्या सारखंच सकाळी उठलो. कालच्या सारखेच हात आधी साबणाने आणि नंतर सॅनिटायझरने धुतले. तोंडावर मास्क लावला आणि ब्रश करण्यासाठी बेसिन समोर उभा राहिलो. मग कालच्या सारखंच लक्षात आलं की मास्क घालून ब्रश करता येणार नाही. मग कालच्या सारखाच मास्क बाजूला काढून ठेवला आणि ब्रश करून आंघोळ आटोपली. आंघोळ करता करता आज फेसबुक लाईव्हवर नवीन कोणतं रडगाणं गाता येईल याचा अंदाज घेतला. जुन्याच रडगाण्याचीही परत एकदा मनोमन उजळणी करून घेतली. हो नवीन काही सुचलं नाही तर उगीच फजिती नको. आता तयारी तर भरपूर केली आहे, तरी वेळेेवर नीट नाहीच सुचलं बोलायला तर त्याला मी तरी काय करणार ? असू द्या. आपण आपले हात वारंवार धुवावेत , मास्क लावावा आणि अंतर राखावं.

आंघोळ आटोपून कालच्या सारखेच पितश्रींच्या फोटोला हात जोडले. परत कालच्या सारखंच कानात आणि मनात ‘ पापा कहते थे बड़ा नाम करेगा , बेटा हमारा ऐसा काम करेगा ‘ गाणं वाजू लागलं . हल्ली हे असं का होतं कळतंच नाही. असू देत. कळेल हळूहळू. नाहीतरी सगळ्याच गोष्टी कुठे वेळेवर कळतात आपल्याला ? आता कमळीबरोबरच्या संसाराचंच घ्या ना, कमळीला सोडून दुसरा घरोबा केल्यावरच कळलं ना, की तिच्या सोबतचा संसार किती सुखाचा होता ते . कधीकाळी आपण ‘ कमळापती’ होतो. नाही म्हटलं तरी थोडाफार का होईना पण तिच्यावर अधिकार गाजवता येत होता. संसार चालवायची जबाबदारी तिचीच होती. आपण फक्त संसारातली उणीदुणी काढायची आणि ‘ कमळापती’ म्हणून मिरवायचं. मस्त आयुष्य चाललं होतं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि नवीन घरोबा करण्याच्या फंदयात पडलो, असं झालंय . हल्ली वर्तमानपत्रात ती, ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.’ ची जाहिरात पहिली ना, की त्या कमळीनेच वर्तमानपत्रात ही जाहिरात आपल्याला दिसेल अशा जागी मुद्दामच तर छापायला लावली नसेल ना , या विचाराने अंगाचा नुसता तिळपापड होतो. नियतीही कोणत्या जन्माचा सूड उगवतेय काय माहीत ? ज्या कमळीला सोडून नवा संसार थाटला , त्याच कमळीच्या दिल्लीतल्या नातेवाईकांपुढे हा नवीन संसार चालविण्यासाठी हात पसरावा लागतोय. वेळ आली, संधी मिळाली, की झालेली चूक सुधरवून घ्यायचा विचार आहे. दिल्लीवाल्यांपुढे हात पसरवून मदत मी आणली आणि आता श्रेय लाटायला बसले आहेत आमचे बंधुराज. काय करावे ? इकडे ‘ डे लाईफ’ बंद करायची पाळी आली आहे आणि तिकडे ‘नाईट लाईफ’ कधी सुरू करताय म्हणून बाळराजेंची डे नाईट भुणभुण सुरू असते. असू द्या. आपण आपले हात वारंवार धुवावेत , मास्क लावावा आणि अंतर राखावं .

झोपण्याची वेळ कधीच झाली आहे, पण सालं गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्याची बुद्धी आपल्याला कशी झाली नाही. आपल्या भवती सगळेच फक्त वाचाळवीरच आहेत की काय, एकालाही बुद्धीचा पत्ता कसा नाही, या विचाराने जीव गुदमरतोय नुसता. तिकडे हॉस्पिटलमध्ये म्हणे ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा आहे , मला तर या खोलीतलाच ऑक्सिजन संपला आहे की काय असं वाटतंय! त्याला आता मी तरी काय करणार ? असू द्या.आपण आपले हात वारंवार धुवावेत , मास्क लावावा आणि अंतर राखावं .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button