मुंबईकर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देतील : चंद्रकांत पाटील

पुणे: हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी काही तरी वेगळं करत असतो. रिक्षाचालकांना कुपन, रेशन किट वाटप केले. तीन हजार लोकांना हे वाटप केलं. वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला आहे, असं पाटील म्हणाले.
राज्यातील कोरोना बळींची संख्या लपवली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मृत्यूची संख्या जाहीर झालेली असताना त्यात एक लाख मृत्यूंचा फरक आहे. देशात राज्याचा वन थर्ड फरक आहे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मोदींचा फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर बोलण्यास पाटील यांनी टाळले. माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. त्याबद्दल आनंद वाटला. मला याबाबत काहीच माहीत नाही, असं बोलून पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. आरक्षण असो की अन्य काहीही राज्यातील आघाडी सरकारला काही करता येत नाही. दहा महिने झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. यापेक्षा वेगळं काही होणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.
गेल्या अनेक वर्षात जेवढं राज्याचे नुकसान झाले नाही तेवढं मागील दीड वर्षात राज्य सरकारने केलं आहे. असा घणाघात चंद्रकांत पाटील राज्य सरकारवर केला आहे. राज्य सरकारने सिस्टम मोडली आहे. कोरोनाचा गोंधळ, आगीच्या घटना, इमारत दुर्घटना अशा अनेक घटना घडत असताना राज्य सरकार गोंधळ घालत आहे. राज्यात कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची आकडेवारी लपवली असल्याच्या चर्चा होत आहे. जर आकडेवारी लपवली असेत तर राज्यात जवळपास लाखाच्या वर कोरोनामृत्यूची नोंद होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्याचे मोठं नुकसान झाले आहे. गेल्या अनेक वर्षात जेवढं राज्याचे नुकसान झाले नसेल तेवढे राज्य सरकारने दीड वर्षात केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने सिस्टम मोडली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जीएडीने फाईल फेटाळल्यानंतर एखाद्याची नियुक्ती करतात आणि ज्या फाईलवर सही करण्यास मुख्यमंत्री नकार देतात याला सिस्टम तोडणं म्हणतात. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच आहे. न्यायालयाने सांगितल्यानंतरही प्रशासन हालचाल करत नाही याचा अर्थ प्रशासनाने सरकारला अडचणीत आणायचे ठरवले आहे का? असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्यात कोरोना असुदेत, आगीच्या घटना असोत, इमारती पडो, दहावीच्या परीक्षा, बारावीची परीक्षा जेवढा गोंधळ घालता येईल तेवढा राज्य सरकार घालत आहे. विरोधी पक्षाचा नेता असल्यामुळे आम्ही बोल्यास बोलतात यांच्या पोटात दुःखत हे काय डॉक्टर आहेत. का आमच्या पोटात दुःखतंय बघायला असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.




