मुळशीच्या कारखान्यातील आगीचा पुन्हा भडका

पुणे : मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून १५ महिलांसह १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोदामातील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केल्याची माहिती आहे.
पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवून कुलिंगचे काम सुरु होते. पण, आज सकाळपासूनच कंपनीच्या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये. सध्या येथे अग्निशमन दलाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी नाही. रात्री उशिरा कुलिंग झाल्यानंतरही आता पुन्हा आग पेटली आहे.
या कंपनीतील आगीत होरपळून तब्बल १८ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तब्बल १५ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर डीएनए टेस्ट केल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. डीएनए टेस्ट पूर्ण होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर या कर्मचाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात येईल.
संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग अधिकच भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली.



