जोहान्सबर्ग : शार्दूल ठाकूरनं भारतीय संघाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिलं. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शार्दूलनं ७ विकेट्स घेताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गुंडाळला. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत अनेक मोठमोठे विक्रम मोडले. पण, भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल झटपट माघारी परतले. संघातील स्थान वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं जबाबदारीनं खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला. दिवसअखेर भारताने २ बाद ८५ धावांपर्यंत मजल मारून ५८ धावांची आघाडी घेतली आहे. पुजारा ३५, तर अजिंक्य ११ धावांवर खेळत आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. २ बाद ४४ धावांवरून अजिंक्य व पुजारा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली आणि दिवसअखेर भारताला २ बाद ८५ धावांपर्यंत मजल मारून ५८ धावांची आघाडी मिळवून दिली. पुजारा ३५, तर अजिंक्य ११ धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी दुसऱ्या सत्रातच दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारतापेक्षा २७ धावांची आघाडी घेतली. आपल्या १७ ओव्हरमध्ये ६१ धावा देत ७ विकेट्स घेण्याची किमया शार्दुल ठाकुरने केली. या स्पेलमध्ये शार्दुलने तीन निर्धाव षटकेही टाकली. शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीमुळेच दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीला चांगला लय सापडूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून इतर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहच्या खात्यात १ विकेट आली.
भारताच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद करून धक्का दिला. कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला. शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं.
आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली होती. पण, टेम्बा बवुमा व कायले वेरेयन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला आघाडीच्या दिशेनं नेलं. पण, पुन्हा एकदा शार्दूल धावला. त्यानं वेरेयनला ( २१) पायचीत पकडले. आफ्रिकेचा निम्मा संघ १६२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बवुमानं आक्रमक खेळ करण्यास सुरूवात करून शार्दूलला चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले, परंतु पढच्याच चेंडूवर शार्दूलनं त्याला तंबूची वाट दाखवली. ५१ धावांवर बवुमाचा यष्टिंमागे रिषभनं सुरेख झेल टिपला.
केशव महाराज व मार्को जॅन्सेन यांनी आठव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ३८ धावा जोडून आफ्रिकेची पहिल्या डावातील आघाडी निश्चित केली. जसप्रीतनं ही जोडी तोडताना महाराजला २१ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर शार्दूलनं उर्वरित दोन्ही फलंदाज माघारी पाठवले.