शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक; पाकिस्तानचा मोठा कट उधळला !

नवी दिल्ली: पाकिस्तानचा मोठा कट उधळण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी २ पाकिस्तानी नागरिकांसह ६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले पाकिस्तानी दहशतवादी कारवाया करत होते. या सगळ्यांची चौकशी सध्या सुरू आहे.
एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यातले २ पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली. या प्रकरणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये छापे टाकण्यात आले. यामधून सहा जण सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या आदेशांवर त्यांचं काम सुरू होतं.
दहशतवाद्यांचं मॉड्युल उद्ध्वस्त करण्यासाठी जवळपास महिनभर दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल कार्यरत होतं. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाती कारवाया घडवण्याचा त्यांचा हेतू होता. त्यासाठीची योजना त्यांनी तयार केली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात फिरून ते रेकी करत होते. पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी तिन्ही राज्यांत छापे टाकत ६ जणांच्या मुसक्या आवळल्या.