पीएम केअर फंडातून पुण्याला मिळालेले ५८ व्हेंटीलेटर्स निरुपयोगी
'ससून'च्या वैद्यकीय अधीक्षकांची तक्रार
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटीलेटर्स मिळाले होते. मात्र हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटीलेटर्स खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटीलेटर्स सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे व्हेंटीलेटर्सच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार असल्याने केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवताना कचराई करण्यात येत आहे, असंही या नेत्यांचं म्हणणं आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही एक पत्रक काढत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत, असा घणाघाती आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.