Top Newsफोकस

ठाण्याजवळ कळव्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश

ठाणे : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात डोंगरावरील दरड एका घरावर कोसळून सोमवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी आपत्ती विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वी दोन जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर लागलीच या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार बचावकार्य सुरु झाले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकल्याने एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये पती पत्नी आणि त्यांची लहान मुलांचा समावेश आहे. तर त्यांच्या कुटुंबातील एक पाच वर्षीय मुलगी आणि अचल यादव (१८) हे बचावले आहेत.

या दुर्देवी घटनेत प्रभु सुदाम यादव (४५), त्यांच्या पत्नी विद्यादेवी यादव (४०) यांच्यासह रविकिशन यादव (१२), सिमरन यादव (१०), संध्या यादव (०३) यांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री पासून बरसत असलेल्या पावसाचा फटका अखेर ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवसभरात १३३.०७ मिमी पावसाची नोंद झाली असतांनाच दुपारी कळव्यातील घोलाई नगर भागातील दुर्गा चाळ या भागात दुपारी १२.३० च्या सुमारास दरड कोसळली आणि त्यात एकाच कुटुंबातील सात जण ढिगाऱ्याखाली अडकले. परंतु याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील दोघांना सुखरुप बाहेर काढले. यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, अग्निशमन दलाचे पथक, अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवळ जवळ चार तास बचावकार्य सुरु होते. डोंगराच्या वरील बाजूवरील दरड वेगाने खाली घरावर पडल्याने पावसात हे बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

दुर्देवाची बाब म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि त्यांची १२ मुलगा, १० आणि तीन वर्षीय मुलगी यांचा दुर्देवी अंत झाला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील १८ वर्षीय मुलगा आणि त्याची पाच वर्षीय बहीण बचावली आहे. येथील डोंगरावर वरपासून खालपर्यंत घरे आहेत, परंतु आता दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील तब्बल १५० कुटुंबांना घोलाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button