
काबुल : तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं भयंकर वातावरण तयार झालं आहे. तेथे प्रत्येकजण देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत चीनने सोमवारी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान आणि चीनने अफगाणिस्तानच्या तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ विकसित करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या ६ दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडताना दिसत आहेत. काबुल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याची बातमी समोर आली होती. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. विमान सेवा मर्यादित असल्याने गोंधळाचं वातावरण होतं.
https://twitter.com/NaqeebSays/status/1427189122620444676
अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. तर, विमानतळावर मुंबईतील लोकल रेल्वे पकडण्यासाठी होत असलेल्या गर्दीचे रुपडे दिसत आहे.
Shocking: Not an Hollywood movie, this is Kabul international airport right now. pic.twitter.com/LLDQrKyLGs
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
काबुल विमानतळावर विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. पत्रकार नताली आमिरी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विमानतळावर जमीनीपासून काही उंचीवरच हेलिकॉप्टर उडताना दिसत आहेत. येथील रनवे रिकामा करण्याचा प्रयत्न तालिबानकडून होत आहे. एक भयंकर व्हिडिओ समोर आला असून अमेरिकन सैन्य दलाच्या विमानाच्या खालील भागाला पकडून काबुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, विमानाने गती घेताच, हे नागरिक खाली कोसळले आहेत.
Räumung des Rollfeldes #kabulairport … #KabulHasFallen #Afghanistan pic.twitter.com/5As7RLmkOG
— Natalie Amiri (@NatalieAmiri) August 16, 2021
‘तालिबान सरकार’ला पाकिस्तान, चीन देणार मान्यता
चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीनं औपचारिकरित्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. तालिबाननं रविवारी राजधानी काबुलमधील राष्ट्रपती भवनावर कज्बा केला. राष्ट्रपती अशरफ गनी सरकारी अधिकाऱ्यांसह तजाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत. अफगाणिस्तानवर आता पूर्णपणे तालिबानचं नियंत्रण आलं आहे आणि लवकरच तालिबानकडून ‘इस्लामी अमीरात ऑफ अफगाणिस्तान’ या संघटनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानला दहशतवादाच्या उत्पत्तीचं ठिकाण होऊ देता कामा नये, असं म्हणत तालिबानला विरोध केला आहे. दुसरीकडे चीन आणि पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील नव्या सरकारसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही देश तालिबान सरकारला मान्यता देण्याची दाट शक्यता आहे. चीनमधील सरकारी मीडिया आपल्या देशातील नागरिकांमध्ये अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची मानसिकता करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. चीनमधील सत्तारुढ कॅम्युनिस्ट पक्षाला इस्लामी समूहाला मान्यता द्यावी लागू शकते असं वातावरण चीनमध्ये तयार करण्यात येत आहे.
व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी नागरिकांची निदर्शने
दरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.