अधिवेशनावर कोरोनाचे संकट गडद: आणखी ३६ जण ‘पॉझिटिव्ह
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारी आठवा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प २०२१-२२ दुपारी दोन वाजता सादर करतील. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनात उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांसह पत्रकारांची कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या दहा दिवसांच्या अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्यासाठी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ६ मार्च आणि ७ मार्चला कोरोना चाचणी करण्याचा दुसरा टप्पा पार पडला. यामध्ये ३६ जण कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी २७ फेब्रुवारी आणि २८ फेब्रुवारी रोजी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामध्ये २३ पोलीस कर्मचाऱ्यांसह २ पत्रकारांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यात २ हजार ७४६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती जेजे रुग्णालयाने दिली आहे.
दरम्यान काल (सोमवार) राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आढळला आहे. राज्यात काल ११ हजार १४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख १९ हजार ९२७ पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० लाख ६८ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार पार!
देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या आठ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी देशात १८ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५९९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १२ लाख २९ हजार ३९८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे.