
पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. ३१ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात ३०१ जण राहिले असून प्रथमच उमेदवारांची संख्या विक्रमी आहे. काही मतदारसंघांमध्ये थेट तर अनेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत.
शिवोलीत सर्वाधिक १३, मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात १२, नावेली व कुंकळ्ळीत प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये ८ ते ९ उमेदवार आहेत. दरम्यान, आयोगाकडून उमेदवारांना निशाण्या वाटण्याचे काम चालू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.
पणजीत शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी माघार घेऊन अपक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे. भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने ते बंड करुन अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. दुसरीकडे मांद्रेत भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच काणकोणमध्ये उपसभापती इजिदोर फर्नांडिस यानी बंडाची भूमिका कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात राहणेच पसंत केले.
भाजपने सर्व ४० मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती असून काँग्रेसने ३७ तर गोवा फॉरवर्डने ३ उमेदवार दिले आहेत. आम आदमी पक्षाने ३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मगोप-तृणमूल युतीनेही ३९ उमेदवार दिले आहेत. युवावर्गाच्या पाठिंब्यावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष प्रथमच रिंगणात आहे. या पक्षाने ३८ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी युतीने २३ तर अन्य लहान पक्षांनी १० मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार दिलेले आहेत.
निकालानंतरही भाजपशी युती नाहीच; ढवळीकरांचे स्पष्टीकरण
निवडणूक निकालानंतरसुध्दा भाजपकडे मुळीच युती करणार नाही, असे मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, २०१७ साली पर्रीकर यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या अटीवरच आम्ही सरकारला पाठिंबा दिला होता. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनविण्यास आमचा मुळीच पाठिंबा असणार नाही.
पत्रकार परिषदेत सुदिन म्हणाले की, पार्सेकर यांनासुध्दा आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधी पाठिंबा दिलेला नाही. मगोप-तृणमूल युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा येत्या १० तारखेपर्यंत जाहीर होईल, असे एका प्रश्नावर सुदिन यांनी सांगितले. मगोप आणि तृणमूलची टीम एकत्रितपणे हा निर्णय घेणार आहे, असे सुदिन यांनी स्पष्ट केले.
भाजप समृध्दीच्या गोष्टी करीत आहे. आज राज्यात जे काही चालले ते पाहता ही समृध्दी नव्हे तर चोरीचा धंदा आहे. या सरकारने नोकऱ्या विकल्या. अनेक अपव्यवहार केले. पुढील १५ दिवसांत या सर्व प्रश्नांवर सरकारला आम्ही उघडे पाडू. सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणार असून मगोप-तृणमूल युतीबाबत कोणीही अपप्रचार करु नये, आम्ही एकसंध आहोत, असेही ते म्हणाले.
गोमंतकीय जनतेला विकासाचा बागलबुवा दाखवला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकल्प सरकारमधील नेत्यांसाठी कमिशन देणारे ठरले आहेत. सत्तेवर येताच या कारभाराची आम्ही चौकशी करून त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणू, असेही ढवळीकर म्हणाले.
महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची देणगी; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची मुख्य देणगी आहे. भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.
चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे ही मोदी सरकारची मोठी चूक होती. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. मात्र, मोदी सरकार हे लपवत आहे. सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि स्थिती खूपच गंभीर आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत, पण सरकार केवळ जाहिरातबाजीत व्यस्त आहे. लोकांनी भाजप सरकारला घरी पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असून, आम्ही स्थिर सरकार देणार आहोत. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही. गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलीटर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो, असे चव्हाण यांनी सांगितले.