
मुंबई: बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर तब्बल २० तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरु होती. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल २० तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.
सोनू आपली पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी १९९६ मध्ये लग्न केले. सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात २६०० चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास ४ बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.