अर्थ-उद्योगराजकारण

घोटाळेबाज त्रिकुटाकडून आतापर्यंत १८ हजार कोटी वसूल

नवी दिल्ली : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांनी आतापर्यंत १८ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात यासंबंधीची माहिती सादर केली. कोर्टाच्या निर्देशानुसार कर्जबुडव्यांविरोधात पीएमएलएच्या अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहिती मेहता यांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माल्या, मोदी आणि चोक्सीच्या संपत्तीच्या विक्रीद्वारे १३१०९ कोटी रुपये मिळविल्याची माहिती दिली होती. बँकांनी अलीकडच्या रिकव्हरीत ७९२ कोटी रुपये वसूल केले आहेत.

केंद्राच्या वतीने सुप्रीम कोर्टात पीएमएलए अंतर्गत दाखल प्रकरणांची माहिती देण्यात आली. सध्या देशात ईडीद्वारे मनी लाँड्रिंग अंतर्गत ४७०० प्रकरणांचा तपास सुरू आहे. सर्व दाखल प्रकरणातील घोटाळ्याचा आकडा ६७००० कोटी रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मनी लाँड्रिग प्रकरणांच्या सुनावणीच्या संथ गतीचा फटका पैशांची रिकव्हरी करण्यासाठी होत असल्याचे सॉलिसिटर जनरल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. दरम्यान, मनी लाँड्रिग कायद्यात फेरबदल करण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाची दारं ठोठावली आहे. केंद्राच्या वतीने देखील याप्रकरणी म्हणणं सादर करण्यात आलं आहे.

विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button