Top Newsफोकसराजकारण

२६/११ दहशतवादी हल्ल्याची १३ वर्षे; थरकाप उडविणाऱ्या आठवणी आणि पाकचा क्रूर चेहरा

मुंबई : २६/११ हल्ल्याची आठवण काढली तरी आजही अंगावर शहारे येतात. या हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा हल्ला केवळ मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा होता. यामध्ये निष्पाप १६६ लोकांनी जीव गमावला, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आजही या हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. मुंबईत झालेला हा दहशतवादी हल्ला भारतासाठी जणू ९/११ च्या हल्ल्याप्रमाणेच होता. या हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा युद्धाच्या सीमेवर आणून ठेवले होते. अमेरिकेसारख्या शक्तीवान देशाला दोन्ही देशांदरम्यानच्या तणावाला कमी करण्यासाठी पुढे यावे लागले होते. दरम्यान आजही या दहशवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या अपराध्यांना शिक्षा मिळालेली नाही. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये तणाव कायम आहे.

भारताकडून १० हल्लेखोरांपैकी केवळ एकट्या अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते. त्यांने आपल्या गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील आपली भूमिका स्वीकारली होती. यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. बऱ्याच कायदेतज्ञांनी कसाबची झटपट सुनावणी आणि घाईघाईने असल्याचे सांगत सवाल उभे केले होते मात्र भारतीय संविधानकडून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या होत्या

या हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.

मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती. त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती. कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली. कसाबला मे २०१० मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. २०१२ मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशीबाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने २१ नोव्हेंबरला फाशी देण्याचं निश्चित केलं. अखेर २१ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

जेव्हा भारताने आपल्या अधिकार क्षेत्रांतर्गत प्रकरणाचा तपास केला, पाकिस्ताननेही एक केस दाखल केली आणि त्यांच्या स्वत:च्या संविधानिक कायदे आणि न्यायालयांतर्गत एक समांतर तपास सुरू केला. सुरूवातीला पाकिस्तानच्या तपासाता ज्यामध्ये जमात उल दावा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद आणि लश्करचा सुप्रीम लीडर झकीऊर रेहमान लखवीसह हल्ल्यात कमीत कमी ७ गुन्हेगारांना अटक झाली होती. २००९मध्ये इजिप्तमध्ये दोन्ही देशांच्या तत्कालीन पंतप्रधानांमध्ये बातचीतदरम्यान भारताकडून प्रशंसा करण्यात आली. दरम्यान, काही दिवसानंतर आणि प्रकरणात सतत स्थगिती दिली गेल्याने पाकिस्तानचा हेतूप्रती भारताला संशय आला कारण नवी दिल्लीने पाकिस्तानी सैन्य प्रतिष्ठान आणि त्यांच्या गुप्तहेर एजन्सींवर भारताविरोधात दहशतवादी गटांना समर्थन दिल्याचा आरोप केला. याच कारणामुळे मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे गुन्हेगार शिक्षेपासून बचावले आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानने सातत्याने हे सांगितलंय की हाफिज सईदचा मास्टरमाईंड होण्यामागे आणि लख्वीच्या मुंबई हल्ल्याच्या मागील मुख्य संचालक असण्याविरोधात भारतीय पुरावे, भारतीय डोजियर पाकिस्तानच्या न्यायालयांना संतुष्ट करण्यात असमर्थ ठरल्या आणि प्रकरण थांबले. तर दुसरीकडे भारत, पाकिस्तानच्या या भूमिकेला फेटाळत आहे आणि भारताने सांगितले की इस्लामाबादने त्यांच्या डोजियरला जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अनेकदा साक्षीदारांनी मूळ साक्ष बदलली

अनेकदा पाहण्यात आले की प्रकरणात साक्षीदारांनी आपली मूळ साक्ष बदलली आणि वकिलांना झटका दिला. खटल्यादरम्यान प्रकरण अधिक लांबवण्यासाठी पाकिस्तानकडून कथित कमांडर आणि त्यांच्या डेप्युटीच्या आवाजाचे नमुने हे रेकॉर्ड केलेल्या आवाजांशी मिळवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानकडून भारतीय पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक तपास डोझियरच्या देण्याघेण्यानंतर ट्रायल कोर्टाकडून व्हॉईस सँपल प्राप्त करण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

दोन मुख्य गुन्हेगार हाफिज सईद आणि लख्वीला पाकिस्तानच्या कोर्टाने नंतर जामिनावर सोडून दिले. लखवीला डिसेंबर २०१४ला सोडण्यात आले होते, मात्र त्याला तीन महिने ताब्यात ठेवण्यात आले. त्यानंतर दहशतवादाविरोधी न्यायालयाने एप्रिल २०१५मध्ये त्याची सुटका केली. कोर्टाने सांगितले की मिळालेले पुरावे त्याच्या शिक्षेसाठी पुरेसे नाहीत. याच प्रकारची कारवाई हाफिज सईद प्रकरणात दिसली होती. यालाहा जामिनावर सोडण्यात आले होते. कोर्टाकडून सुटका होण्यापूर्वी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. लखवीच्या प्रकरणातही हेच घडले. या प्रकरणातील ६ अन्य आरोपी याच कारणांमुळे जामिनावर बाहेर आहेत.

पाकिस्तानचा क्रूर चेहरा

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांनी मुबईवर हल्ला करण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्यदलाला तीन दिवसानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, लिओपाल्ड कॅफे, यासह दोन रुग्णालय आणि एका थिएटरवर दहशवादी हल्ला केला होता.

पाकिस्तानी न्यूज वेबसाईट डॉनमधील एका लेखानुसार पाकिस्तानी यंत्रणांना मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील माहिती समोर आली होती. त्या माहितीनुसार २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होते. या लेखानुसार भारतीय सेना आणि मुंबई पोलिसांनी ९ आतकंवाद्यांचा खात्मा केला होता. अजमल कसाबला पकडण्यात आले होते. कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले होते. दहशतवादी संघटनांमध्ये कसाब सामील झाल्याचे पुरावे देखील मिळाले होते. लष्कर-ए-तोयबा ने दहशतवाद्यांना थाटा, सिंधजवळ प्रशिक्षण दिले, त्यानंतर त्यांना भारतात सागरी मार्गानं भारतात पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दहशतवाद्यांनी मुंबईत दाखल होण्यासाठी वापरलेल्या बोटीला रंगवून लपवण्यात आले होते. चौकशीत ती बोट हस्तगत करण्यात आली होती. मुंबईजवळ दहशतवाद्यांनी डिंगी इजिनचा वापर केला होता,त्यावर एक पेटंट क्रमांक होता. चौकशीमध्ये ते डिंगी इंजिन जपानमधून लाहोरला मागवण्यात आले होते. त्यानंतर ते कराचीला पाठवण्यात आले. कराचीमधील स्पोर्टस साहित्य विक्री करणाऱ्या दुकानातून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी डिंगी इंजिन खरेदी केले होते. कराचीतील ऑपरेशन रुममधून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नियंत्रित करण्यासाठी वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला होता. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानातील कमांडर आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्यांना अटक करुन त्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात आली होती.

१३ वर्षांनंतरही पाकिस्तानातील अतिरेकी मोकाट

पाकिस्तानातील फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीनं मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची एक यादी जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये २६/११ हल्ल्याप्रकरणात सहभागी असणाऱ्या १९ जणांच्या नावांचा समावेश आहे. २६/११ च्या हल्ल्याला १३ वर्षे झाली आहेत. मात्र, पाकिस्तान चौकशीचं कारण सांगत दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली नाही. फेडरल इन्वेस्टिगेशननं जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत अमजद खान, इफ्तिखार अली, शाहिद गफूर, अब्दुल रहमान, उस्मान, अतीक उर रहमान, रियाज अहमद, मुश्ताक, नइम, अब्दुल शकूर, साबिर सालकी, उस्मान, शकील अहमद, उस्मान जिया, अब्बास नसीर, जावेद इकबाल, मुख्तार अहमद, अहमद सईद, मोहम्मद खान यांचा समावेश होता.

डोजियरच्या रिपोर्टनुसार अमजद खान लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेली फौज नावाची बोट खरेदी केली होती. कराचीमधील एआरझेड वॉटर स्पोर्ट्समधून यामाहा मोटार बोट इंजिन, लाईफ जॅकेट आणि इतर वस्तू अमजद खानने खरेदी केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button