Top Newsफोकस

वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी, १३ जणांचा मृत्यू; दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती

जम्मू : जम्मूच्या कटरामधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात रात्री २ च्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे. दुर्घटनेनंतर यात्रा स्थगित कार्यांयत आली होती, मात्र आता पुन्हा यात्रा सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोना काळात एवढी गर्दी कशी झाली? गर्दी झाली तर सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. आता घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच घटनेतील मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मदत निधि आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान मदत निधीतून मदत : मृतांच्या नातेवाईकांसाठी २ लाख रुपये, जखमींना उपचारासाठी ५० हजार रुपये

राज्य सरकारकडून मदत : मृतांच्या नातेवाईकांसाठी १० लाख रुपये, जखमींना उपचारासाठी २ लाख रुपये

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माता वैष्णो देवी भवनातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळं दु:खी आहे. सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा केली आहे.

माता वैष्णोदेवी येथील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ताबडतोब कटरा येथे जात आहे. मी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यार आहे आणि पंतप्रधान मोदी यांना परत रिपोर्ट देणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

श्रद्धाळू ऐकतच नाहीत, विशेषत: तरुण पिढी : जितेंद्र सिंह

या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. या ठिकाणी येणारे भाविक समजून घेत नाही. विशेष करून तरुण पिढी ऐकून घेत नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असून गेलेले नाही. कोरोनासंदर्भात गाइडलाइन्स देण्यात आलेल्या आहेत. तरीही वैष्णो देवी मंदिरात मोठी गर्दी झाली. विशेष करून तरुण पिढी समजून घेत नाही. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी उपस्थित होती. त्यावेळेस बाचाबाची झाल्याचे सांगितले जात आहे. दर्शनासाठी येणारे भाविक समजून घेत नाहीत. दुसरीकडे तरुण पिढी ऐकत नाही. कोरोनाच्या गाइडलाइन्स पुन्हा लागू करण्यात आल्या असून, एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button