शिक्षण

वेळापत्रक जाहीर केल्यानंतर २४ तासातच गुजरातमधील १२वी च्या परीक्षा रद्द !

गांधीनगर : देशशभरातील सीबीएसईच्या १२वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेतल्यानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी १ जूनरोजी जेव्हा एकीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला, तिथे दुसरीकडे गुजरातमध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षांचं सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये १ जुलैपासून या परीक्षांना सुरुवात होणार होती. या परीक्षा पुढे १६ जुलैपर्यंत चालणार होत्या. तसेच, या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मात्र, याचवेळी केंद्र सरकारने सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत गुजरात सरकारनं राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी यासंदर्भात घोषणा केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. त्यामुळे गुजरातमधल्या १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा मोठा दिलासा मानला जात आहे.

देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरातच्या पाठोपाठ मध्य प्रदेश सरकारने देखील राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button