राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल १२९ नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचं थोरात म्हणाले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण ५ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १२९ वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.




