Top Newsफोकस

तामिळनाडूत हेलिकॉप्टर दुर्घटनेत १३ ठार; सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी

तामिळनाडू : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे, तर सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्यापतरी समोर आली नाही. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

राजनाथ सिंह उद्या संसदेत माहिती देणार

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत देण्याची शक्यता आहे. त्याआधी राजनाथ सिंह घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही काही वेळात घटनास्थळाला भेट देणार आहेत. तर वायुसेनाप्रमुख घटनास्थळाकडे रावाना झाले आहेत. ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

राष्ट्रपतींचा दरबार हॉलमधील कार्यक्रम रद्द

लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याकारणाने राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. त्यामुळे या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केल्याचे दिसून येत आहे.

बिपीन रावत यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला

आपघात जखमी झालेले सीडीएस बिपीन रावत यांच्या दिल्लीतील घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी सुरक्षादलाची बैठकही घेतली आहे.

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, Mi-17V5 हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. सीडीएस रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ कॉलेज वेलिंग्टनमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचे दुपारी २.४५ वाजता व्याख्यान होते. ते दिल्लीहून सुलूर फिक्स्ड विंगमध्ये गेले. सुलूर ते वेलिंग्टन हे अंतर ५३ किलोमीटर होते. त्याचवेळी कुन्नूर ते वेलिंग्टन हे अंतर केवळ तीन किलोमीटर होते आणि हेलिकॉप्टर लँडिंगपूर्वीच कोसळले.

दोन इंजिन, रशियन बनावट; उड्डाणापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण

लष्कराच्या MI-17V5 या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत प्रवास करत होते. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते.

लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन असतात. व्हीआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हीआयपी या विमानातून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते. मात्र तरीदेखील हा अपघाताचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांना तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत. हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहेत. ते रुग्णालयातही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायुसेनाप्रमुख अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button