Top Newsराजकारण

रावत यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि थोड्याच वेळात संपर्क तुटला…

राजनाथसिंगांकडून लोकसभेत संपूर्ण घटनाक्रमाचे कथन; सभागृहाची श्रद्धांजली

नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची संसदेत माहिती दिली. हा अपघात नेमका कसा घडला? हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? आणि घटनेच्या चौकशीच्या संदर्भानं राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.

राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली. कुन्नूर एअर बेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन एअरबेसला हेलिकॉप्टरला लँड करायचं होतं. कुन्नुर एअरबेसच्या एअर ट्रफिक कंट्रोलचा जवळपास १२ वाजून ८ मिनिटांनी हेलिकॉप्टरशी आपला संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर जवळ काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. त्यावेळी पळतच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरचे अवशेषांना आग लागलेली त्यांनी पाहिली, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून एक मदत कार्य करणारं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी क्रॅश साईटवर जखमींना रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्या अवशेषातून जेवढ्या लोकांना काढणं शक्य होतं, तेवढ्यांना तात्काळ बाहेर काढून वेलिंग्टनच्या रुग्णालयात नेलं. मिळालेल्या माहितीनुसार त्या हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ लोकांचा मृत्यू झाला. ज्यांची मृत्यू झाला त्यात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश होता. शिवाय त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवीनदर सिंग लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरविंद सिंग आणि एअर फोर्स हेलिकॉप्टर क्रूसहीत आर्म्सफोर्सचे अन्य नऊ लोकांचा मृत्यू झाला. त्यात विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान, स्क्वॉन्ड्रन लिडर कुलदीप सिंग, राणा प्रताप दास, अरकल प्रदीप, हरविंदर सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, बी साई तेजा आदींचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वांचे पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीत आणणार

आज संध्याकाळी या सर्वांचे पार्थिव इंडियन एअर फोर्सच्या विमानाने दिल्लीत आणल्या जाणार आहे. सीडीएस रावत यांचा अंत्यसंस्कार मिलिट्री ऑनर्सनुसार केला जाईल. इतरांचाही मिलिट्री ऑनर्सनुसारच अंत्यसंस्कार केला जाईल, असं सांगतानाच ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टनच्या हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुर्घटनेची चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींना घटना स्थळी कालच पाठवलं होतं. त्यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काल वेलिंग्टनला जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभा अध्यक्षांकडून शोक व्यक्त

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कालच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो. पहिले सीडीएस असलेल्या रावत यांनी देशाच्या रक्षणात मूलभूत परिवर्तन आणण्यात मोठं योगदान दिलं. त्यांना देशाच्या प्रती समर्पणासाठी सदैव स्मरण केलं जाईल, असं ओम बिर्ला म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button