राजकारण

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप करत कोर्टात धाव घेतली आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलनं त्यांच्याविरोधातील मुंबईतील तीन खटले हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करण्यासाठीची याचिका सुप्रीम कोर्टात केली आहे. याचिकेत कंगनानं शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे.

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी कंगना आणि तिच्या बहीणीनं याचिकेतून केली आहे.

कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे त्यांच्या मुंबईत तीन खटले सुरू आहेत. मुंबईतील वकील अली कासीफ खान यांनी कंगनाविरोधात खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांनी केला आहे. अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. तिसरा खटला कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात केला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी अंधेरी कोर्टानं कंगनाविरोधात वॉरंट देखील जारी केलं आहे. कंगनाला सातत्यानं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देऊनही ती चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यानं हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

कंगना आणि तिच्या बहिणीनं आता या तिन्ही खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. दरम्यान, खटल्याची स्थानांतरण करण्यासाठी कंगनानं शिवसेनेवर आरोप करत दिलेलं कारण यावरुनही आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांकडून अद्याप कंगनाच्या या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button