फोकस

हा थयथयाट कशासाठी?

- अ‍ॅड. योगिनी बाबर

महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील पोलीस खात्यांतील भ्रष्टाचार सर्वसामान्यांना नवा नाही. पोलीस आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना कोणत्या थरावर जातात याचे अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. मग ती प्रकरणे महिला अत्याचाराची, आर्थिक फसवणुकीची असोत वा संपत्तीच्या वादाची, प्र्त्येक प्रकरणांत पोलीस आपला अर्थपूर्ण फायदा कसा होईल याचा पूर्ण प्रयत्न करतात. आजवर जे जे गृहमंत्री झाले त्या त्या काळात पोलिसांच्या बदल्या, पदोन्नती, एखाद्या प्रकरणात दिली जाणारी ‘क्लिन चीट’ यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आले आहेत. आणि सत्ताधारी, विरोधक सर्वपक्षीय नेत्यांसाठी हे पुरते ज्ञात आहे, हे कोणीही नाकारणार नाही. असे असताना परमबीर सिंग यांनी आपली बदली झाल्यानंतर काही दिवसांनतर अचानक ‘लेटर बॉम्ब’ टाकून चर्चेला नवा खुराक देण्यामागे नेमकी कोणती शक्ती, राजकीय हेतू कार्यरत आहे, हे पाहणे महत्वाचे ठरते आहे.

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत मेहनत घेतली आहे. २४ तासांहूनही अधिक काळ सलग कर्तव्य बजावणाऱ्या कनिष्ठ पोलिसांच्या कर्तबगारीला मनापासून सलामच करायला हवा. ऐन कोरोना काळातच अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणात याच कर्तव्यदक्ष मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित करण्यात आली. संपूर्ण देशभरात मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करण्याची चढाओढ सुरु होती. त्यावेळी पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगणा रानौत यांनी मुंबईला रणांगणाचे रुप देत बॅलिवूडसह देशभरात मुंबई पोलीस आणि मुंबई बॉलिवूडविरुद्ध जणू मोहीमच उघडली होती. पण म्हणतात ना ‘शिशोंके घरोंमे रहने वाले दुसरोंके घरोंपर पत्थर नही फेंका करते…’ त्याचेच तर प्रत्यंतर अर्णव गोसावी आणि कंगणा रानौत यांनी टीआरपी घोटाळा, अवैध बांधकाम, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणांत अनुभवले. सध्या दोघांनाही आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणांत झाडून सर्व भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलिसांवर सडकून टीका केली होती. पोलीस वेलफेअर कार्यक्रमांत पोलिसांप्रती ऋणी असल्याचा दावा करीत त्यांच्यासाठी गाणी गात स्वतःची हौस भागवून घेणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही आता मुंबईत राहण्याची लाज वाटते अशा अर्थाचे ट्विट केले होते. अर्णव गोस्वामी आणि कंगणासह तमाम भाजपावाले याच परमवीर सिंगाच्या बदलीसाठी जीवाचे रान करीत होते. आता त्याच परमवीर सिंगांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सचिन वाझे प्रकरणाची दिशा भरकटवण्याचे कारस्थान सुरु आहे अशी शंका शेंबड्या पोरालाही यावी असे राजकारण सुरु आहे.

परमबीर सिंगांनी बदली झाल्यानंतर काही दिवसांनी असे आरोप करणारे पत्र लिहावे आणि तेही स्वतःची सही न करता, टाईप केलेल्या पत्राचा नमुना मुख्यमंत्र्यांनी नेमून दिलेल्या ईमेलवर न धाडता तो वेगळ्याच ईमेलवर पाठवणे, मुख्यमंत्री वा इतर कोणत्याही वरीष्ठांशी संभाषण नकरता थेट राज्यपालांना पत्र कसे काय पोहोचते? राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील संबंध लक्षात घेता परमबीर सिंगांना थेट राज्यपालांपर्यंत कोणी नेले असावे, हे उघड गुपित आहे. डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आल्यानंतर आपण गोवले जावू या भीतीने, तर सचिन वाझे प्रकरणाला हा ‘यू टर्न’ दिला जात नसेल?

कोरोनाशी लढताना एकीकडे प्रशासकीय यंत्रणा दमून चालल्या आहेत आणि विरोधक याचाच फायदा घेत आहेत, असे सरळ चित्र आहे. कोरोना काळात विविध कारणाने मोर्चे, आंदोलन करुन व्यवहार सुरळीत करायला सांगणाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात सत्ताधाऱ्यांवर बेछूट आरोप करणे, प्रकरण अंगाशी येते आहे असे दिसताच भलत्याच विषयाला समोर आणणे, ज्याला ना आगा ना पिच्छा… असेच काम करीत सामाजिक स्वास्थ्य भंग करण्यातच धन्यता मानली जात आहे.

सुशांतसिंग, दिशा सालियन प्रकरणात ठामपणाने माध्यमांसमोर आपल्याकडे पुरावे आहेत आपण ते सीबीआयला देणार अशी वक्तव्ये करणाऱ्या किती नेत्यांनी पुरावे जमा केले आहेत, जर जमा केले नसतील तर त्यांच्यावर दिशाभूल करण्यासाठी गुन्हा का दाखल केला जात नाही? सुशांत प्रकरणानंतर कंगणा, अर्णव दोघेही अडचणीत आले. त्यानंतर संजय राठोड प्रकरणात एकामागून एक क्लिप्स समोर आणल्या गेल्या. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणातील सत्यता अद्यापही वादातीतच आहे. त्या प्रकरणांतील दोन कथित आरोपी नेमके कोठे आहेत याविषयी बातम्याही येणे आता बंद झाले आहे. म्हणजेच कोणीतरी पेैसे पेरते आणि बातम्या उगवतात अशी काहीशी गत आहे. त्याच पद्धतीने अंबानींच्या घराच्या परिसरात सापडलेले स्फोटक प्रकरण. सचिन वाझे यांना परमबीर सिंग यांनी स्वतःच्या जबाबदारीवर नोकरीवर घेतले होते, असा खुलासा गृहमंत्र्यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्यावर थेट अब्रु नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. असाच दावा वाझे प्रकरणांत वरुण सरदेसाईंनी केला होता, अर्थातच याइशाऱ्यानंतर सरदेसाईंवर आरोप करणाऱ्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवलेला दिसला. वाझे प्रकरण देशाच्या वरिष्ठ तपास यंत्रणेकडे असताना अशाप्रकारचे पोरकट तमाशे करीत तपास यंत्रणांना भरकटवण्याचे षडयंत्र का बरे होत असावे? यातून कोणाचा काय फायदा होणार आहे? का वाझे प्रकरणाचा फुगाही फुटणार आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही या भीतीनेच या कुरघोडया सुरु झाल्या आहेत?

एकंदरच राजकीय पटलावर सातत्याने चमकोगिरी करण्यासाठी रोज नव्याने काहीही बडबडत सुटायचे असे काहीसे सध्या सुरु आहे. या सर्व प्रकारांत प्रत्यक्षांत मैदानात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मात्र कात्रीत सापडले आहेत यात शंका नाही. विरोधकांना वाटते आपण हे जे काही करतो ते जनतेच्या भल्यासाठी, मग पाच वर्षे जेव्हा सत्ता होती तेव्हा हे भल्याचे राजकारण ते विसरले होते का? मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गृहखात्यातील अंतर्गत बदल्या, बढती आणि इतर कारणांसाठीच्या तडजोडी म्हणे सांस्कृतिक वारसा असणाऱ्या विद्येच्या माहेरघरात पुण्याच्या प्रागंणात राजरोसपणे घडत होत्या. मंत्रालयात या कारणासाठी आलेल्यांना थेट पुणे गाठावे लागत होते, हा प्रवास विरोधक विसरलेत की, आत्ता सत्तेत असणारे त्यांचे २५ वर्षे मित्र असणारे हे कारनामे त्यांना विसरु देतील असा भाबडा विश्वास विरोधी नेत्यांना वाटतो आहे!

राजकारणाचा एक नियम आहे, दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्डयात आपणच कधी गुदमरतो हे कळतही नाही… म्हणूनच तर ज्याला वेड पांघरुण पेडगावला जाण्याचे हे छक्के पंजे जमतात त्यालाच पुन्हा पुन्हा सत्तेवर येण्याची, सत्ता अनुभवण्याची, सत्तेची मस्ती पचवण्याची संधी मिळते. अन्यथा… ‘अध्यक्ष महोदय.. मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ असा इको ऐकत बसायची वेळ येते. एकंदरच सचिन वाझे, डेलकर, मनसुख, सुशांत, दिशा या सर्वातील सत्य राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय बाहेर येईल तेच सत्य असेल! या राजकीय आरोप-प्रत्यारोपात जनता, जनतेचे हित, जनेतचा कळवळा मात्र कोठेच दिसत नाही. मग हा इतका थयथयाट कशाकरीता! समजा उद्या गृहमंत्रीच काय मुख्यंमत्रीही पायउतार झालेच तर म्हणून महाराष्ट्रातील ही सुज्ञ जनता विरोधकांना खरेच का लगेच सत्तेवर बसवणार आहे, यावरही मंथन व्हायलाच हवे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button