राजकारण

हनुमान चालीसाचे पठण, शंखध्वनी यामुळे कोरोनापासून बचाव; भाजपा मंत्र्यांचं अजब विधान

भोपाळ – देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा आवर्जून सल्ला दिला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असतानाच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आमदार आणि मंत्री मंगळवारी मास्क न लावता दाखल झाले.

सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर देखील मास्क न लावता विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यांना यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे” असं म्हटलं आहे. तसेच मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

बसपाच्या आमदार रमाबाई परिहार याही मास्क न लावता विधानसभेत दाखल झाल्या. “ज्याच्यात धैर्य आहे, केवळ तोच काहीतरी करू शकतो. मास्क न लावल्याबद्दल जो काही दंड असेल तो मी भरेन. मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखं होतं” असं रमाबाई परिहार म्हणाल्या. लोकं रस्त्यावर चाट भजी खायला जातात. विनाकारण रस्त्यावर जाण्याची गरज नाही. यामुळेच रुग्णवाढ झाली आहे असं देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button