शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जिओला फटका; युजर्सच्या संख्येत घट
नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओला बसला आहे. रिलायन्स जिओलाशेतकरी आंदोलनामुळेपंजाब आणि हरियाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
ट्रायने दिलेल्या डेटानुसार, डिसेंबर 2020 मध्ये फक्त पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांत रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घट झाली आहे. शेतकरी आंदोलनाची देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही झळ बसली आहे. कंपनीच्या पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाबमध्ये जिओचे 1.40 कोटी युजर्स होते. तर डिसेंबरच्या शेवटी ही संख्या 1.25 कोटींवर येऊन पोहोचली आहे.
गेल्या 18 महिन्यांत जिओच्या युजर बेसमध्ये सर्वात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कर्मशिअल लाँच नंतर हे दुसऱ्यांदा असं घडलं असून मोठ्या संख्येने युजर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे हरियाणामध्येही जिओच्या युजर्सची संख्या लक्षणीय घटली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये जिओच्या युजर्सची संख्या 94.48 लाख होती. ती डिसेंबरअखेर 89.07 लाख इतकी झाली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच झाल्यानंतर हरियाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत प्रथमच इतकी घट झाली आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. राकेश टिकैत यांनी “अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे.