विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी ठाकरे सरकारचे दबावतंत्र?

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता ठाकरे सरकारकडून नव्या मार्गाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कायदेशीर दबाव निर्माण करुन किमान काही नावांना मंजुरी मिळवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी ठाकरे सरकारकडून 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेक पत्रं पाठवली आहेत. त्यानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपालांना वेळोवेळी या गोष्टीची आठवणही करुन देण्यात आली. सुरुवातीच्या काळात राज्यपालांकडून या विलंबासाठी कोरोना परिस्थितीचे कारण पुढे केले जात होते. मात्र, आता कोरोनाची पहिली लाट ओसरुन दुसरी लाट येण्याची वेळ आली तरीही राज्यपाल कोश्यारी याबाबत कोणताही निर्णय घ्यायला तयार नाहीत.
त्यामुळे आता ठाकरे सरकारने कायदेशीर डावपेच वापरायचेच ठरवले आहे. त्यासाठी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून एक पत्र लिहण्यात आले आहे. हे पत्र आता राज्यपालांना पाठवले जाईल. या पत्रात कायदेशीर युक्तिवाद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यपाल 12 पैकी सरकारने सुचविलेल्या काही नावांना तरी मंजुरी देतील, असा कयास बांधला जात आहे.
या सगळ्या वादामुळेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने भगतसिंह कोश्यारी यांच्या विमानप्रवासाला परवानगी नाकारल्याचे समजते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. मात्र, विमानात बसल्यानंतर त्यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली होती. यानंतर राज्यपाल खासगी कंपनीच्या विमानाने उत्तराखंडला रवाना झाले होते.