वाढीव पदांची यादी जाहीर करा : प्रा मुकुंद आंधळकर
मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने २००३-०४ ते २०१८-१९ या काळातील वाढीव पदांची माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी माननीय शिक्षण आयुक्तांना केली असून ज्या शिक्षकांची नावे यादीत नाहीत पण ते वाढीव पदांवर काम करीत आहेत अशा शिक्षकांची नावे कागदपत्रे मागवून समाविष्ट करावीत व त्यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती केली आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे.
राज्यातील २००३-०४ ते २०१८-१९ या काळातील १२९८ कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांना मान्यता देण्याबाबत शासन स्तरावर कागदपत्रे नस्ती तपासणी चालू आहे. महासंघाच्या असे निदर्शनास आले आहे की, शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक यांनी केलेल्या वाढीव पदांच्या यादीत तफावत आहे. तसेच काही शिक्षक वाढीव पदांवर कार्यरत असूनही त्यांची नावे कोणत्याही यादीत नाहीत. सुमारे २०० ते २५० शिक्षकांची नावे यादीत नसल्याचे जाणवते आहे असे महासंघाचे नियामक प्रा मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
वाढीव पदांना मान्यता दरवर्षी नियमितपणे मिळणे आवश्यक असताना व तसा आदेश असतानाही वर्षानुवर्षे शिक्षक पदांना मान्यता मिळत नाही व आता या पदांना मान्यता देण्याबाबत प्रक्रिया सुरू असताना शिक्षकांना त्यांची नावे नसल्याचे कळल्यामुळे प्रचंड धक्का बसला आहे, त्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. वाढीव पदांची यादी जाहीर करण्यात यावी, ज्यांची नावे यादीत समाविष्ट नसतील पण ते जर वाढीव पदांवर कार्यरत असतील तर त्यांची नावे कागदपत्रांसह मागवून घ्यावीत व त्यांचा समावेश करून वाढीव पदमान्यतेचा शासनादेश काढावा अशी विनंती महासंघाने केली आहे.