अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना अलिगढ मुस्लिम विद्यापीठात खळबळ माजली आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसांत ४४ कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा समावेश आहे. तर उर्वरित २५ कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत. प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात येणाऱ्या काही दिवसांत अजून कोरोना रुग्ण आढळण्याची तसंच मृत्यू होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनी यासंबंधी आयसीएमआरला पत्र लिहिलं आहे. प्राणघातक विषाणूंमुळे हे मृत्यू झाल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं असून यासंबंधी अधिक शोध घेण्याची विनंती केली आहे. “एखादा जीवघेणा विषाणू अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि आजुबाजूच्या परिसराशी जोडलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरात संक्रमित होत असल्याच्या शंकेला यामुळे बळ मिळत आहे,” असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. दरम्यान चाचणीचे नमुने तपासासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) पाठवण्यात आले आहेत.
“विद्यापीठाची स्मशानभूमी आता पूर्ण भरली आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक मोठे डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डीन, चेअरमन यांचाही समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असणाऱ्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाला आहे,” अशी माहिती राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉक्टर आर्शी खान यांनी दिली आहे.
अलिगढ विद्यापीठात जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यामधील १६ हजार विद्यार्थी १९ हॉस्टेल्समध्ये राहतात. सुरुवातीला जेव्हा विद्यापीठ बंद होतं, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्येच आश्रय घेतला होता. पण आता तेदेखील मोकळे होऊ लागले आहेत.