स्पोर्ट्स

अखेरच्या दोन कसोटीसाठी उमेश यादवचा भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. चार सामन्यांच्या या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये झाले. पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकला. त्यामुळे सध्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून या मालिकेचे अखेरचे दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये रंगणार आहेत. या सामन्यांसाठी काही दिवसांपूर्वी भारताने आपल्या संघाची घोषणा केली होती. वेगवान गोलंदाज उमेश यादव पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. तसेच फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला, तरच त्याचा अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. उमेश आता फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला असून त्याला अखेरच्या कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळाल्याचे सोमवारी बीसीसीआयने सांगितले.

उमेशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. तसेच त्याला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यांनाही मुकावे लागले. मात्र, आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

शार्दूलला मुंबईकडून खेळता येणार
‘भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने रविवार, २१ फेब्रुवारीला मोटेरा येथे फिटनेस चाचणी दिली. या फिटनेस चाचणीत तो उत्तीर्ण झाला असून अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे,’ असे बीसीसीआयने आपल्या पत्रकात लिहिले. तसेच उमेश फिट झाल्याने आता शार्दूल ठाकूरला विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button