स्पोर्ट्स

राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे कित्येक वर्षे जगातील सर्वात मोठे क्रिकेट ग्राऊंड होते. मात्र, आता हा विक्रम भारतातील अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियमच्या नावे झाला आहे. सरदार पटेल स्टेडियमची आसनसंख्या १ लाख १० हजार इतकी असून हे आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम झाले आहे. या स्टेडियममध्ये बुधवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या या स्टेडियममधील पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या सामन्याआधी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत.
अहमदाबाद येथील हे क्रिकेट स्टेडियम १९८३ मध्ये बांधण्यात आले होते आणि २००६ रिनोव्हेट करण्यात आले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये काही आंतरराष्ट्रीय सामने झाले. भारताने या स्टेडियममध्ये अखेरचा कसोटी सामना २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच खेळला होता. चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने या कसोटीत ९ विकेट राखून बाजी मारली होती. परंतु, त्यानंतर २०१५ मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे नव्याने बांधण्याचे ठरवण्यात आले आणि याचे काम मागील वर्षी पूर्ण झाले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटी सामना हा नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. सरदार पटेल स्टेडियम हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून याची आसनसंख्या १ लाख १० हजार इतकी आहे. मात्र, कोरोनामुळे या सामन्यासाठी आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button