राजकारण

इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ?

काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणे कठीण झाले आहे त्याच दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचे सरकार नसून ते मुठभर लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर आहेत. कच्च्या तेलाच्या आजच्या किंमती पाहता पेट्रोल ३५ रुपये तर डिझेल २५ रुपये लिटर असायला पाहिजे होते पण पेट्रोलने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. यामुळे महागाई वाढली आहे. सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर या दरवाढीसंदर्भात हात वर केले असून पेट्रोल डिझेलच्या किमती आपल्या हातात नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. भाजपा सरकारने सत्तेवर येताना पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनालाही त्यांनी हरताळ फासला आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी जनतेने भाजपाला सत्ता दिली का? याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, देवानंद पवार व राजन भोसले हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button