भुजबळ यांनाही कोरोनाची लागण; शरद पवारांनी रद्द केले १ मार्चपर्यंतचे कार्यक्रम

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ठाकरे सरकार पुन्हा अलर्टवर आलं आहे, दिवसाला ५ हजाराहून अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता, यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील ८ दिवस महत्त्वाचे असून जर नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क घातला नाही तर लॉकडाऊन निश्चितच होणार असा इशारा दिला आहे.
यातच राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, हे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आले होते, रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील हजर होते, त्यामुळे शरद पवारांनी खबरदारी म्हणून १ मार्च पर्यंत त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.