अर्थ-उद्योग

भारत बंद : देशातील तब्बल ८ कोटी व्यापारी २६ फेब्रुवारीला संपावर

नवी दिल्ली : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ही व्यापाऱ्यांची संघटना. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी ) तरतुदींचीमध्ये फेरबदल करण्याच्या मागणीला लावून धरत या संघटनेनं २६ फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन केलं आहे. यादिवशी देशभरातील सर्व व्यावसायिक बाजार बंद राहतील.

CAIT चा दावा आहे, की यादिवशी 8 कोटीहून अधिक व्यापारी संपावर असतील. कॅटच्या नेतृत्वात येत्या 26 फेब्रुवारीला GST मधील कथित निरर्थक आणि अतार्किक तरतुदींना (unfair provisions in GST) परत घेण्यासह अमेझॉन या इ-कॉमर्स (E-commerce company Amazon) कंपनीवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

देशाच्या दळणवळण क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशननं आधीच कॅटच्या या व्यापारी बंदला समर्थन दिलं आहे. सोबतच यादिवशी दिवसभर चक्का जाम करण्याचीही घोषणा या संघटनेनं केली आहे. याशिवाय मोठ्या संख्येनं अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनाही या व्यापारी बंदच्या समर्थनात समोर आल्या आहेत.

यात विशेषकरून ऑल इंडिया एफएमजीसी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पायसेस ट्रेडर्स असोसिएशन, ओळ इंडिया कम्प्युटर डीलर्स असोसिएशन, ओळ इंडिया कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादी संघटना आहेत.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं, की जीएसटीमधील अनेक अन्याय्य आणि अयोग्य तरतुदी आम्ही नाकारतो. यात माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप तोटा सोसावा लागतो. हे तर मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही नव्हतं. कॅटचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल आणि भरतिया यांनी असा आरोप केला, की जीएसटी कॉन्सिलनं आपल्या फायद्यासाठी जीएसटीचं स्वरूप बिघडवलं आहे. व्यापाऱ्यांच्या या संपाचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार नसला तरी त्या दिवशी सगळे घाऊक बाजार बंद राहतील. त्यामुळे माल वाहतूक विस्कळीत होऊ शकते. पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे त्या दिवशी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असायची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button