बेपत्ता मंत्री संजय राठोड मंगळवारी प्रकटणार
मुंबई : मुळची परळी येथील परंतू इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात असलेल्या टिकटॉकस्टार पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यावरून राज्यात मोठे वातावरण तापले आहे. यामध्ये शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. यामुळे राठोड गेल्या 10-12 दिवसांपासून नॉट रिचेबल असून सरकारमधील काही लोकांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई, तपास सुरु आहे. अशातच राठोड केव्हा बाहेर येणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे सांगितले होते. मात्र, राठोड काही आले नाहीत. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच- सहा दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज वाशिमच्या पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. असलेले वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली. यामुळे अखेर राठोड लोकांसमोर येणार आहेत. परंतू ते पूजा चव्हाण प्रकरणी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.