दादांच्या मनात काय चाललेय हे कळावे म्हणून मी ‘ती’ भाषा शिकणार : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्याचे मिश्किल भाष्य

शिवनेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवजन्मसोहळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना मिश्किल भाष्य केले. छत्रपतींना येणाऱ्या भाषांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी नवीन भाषा शिकणार असल्याचे म्हणताच एकच हशा पिकला.
शिवनेरी किल्ल्यावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराज यांना येत असलेल्या भाषांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यामधील एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे कळले पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. यासोबतच शिवसुमन हे फुल. हे फुल यापूर्वी बघितले नव्हते अशातला भाग नाही. मात्र, त्याच वैशिष्ट्ये आज कळाले आहे. ते फुल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलेय. हा शिवयोग आहे. ज्यांनी ते शोधले, त्याचे वेगळेपण ओळखले मी त्यांचे कौतूक करतो.’ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदींची उपस्थिती होती.