जनतेच्या खिशातील पैसे मित्रांना देण्यात मोदी सरकार मग्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – गेल्या कित्येक दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दराने ‘शंभरी’ गाठली असून पंपचालकांनी लगेचच विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीवरून हल्लाबोल केला आहे.
“तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे” असं राहुल यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी याआधीही ट्वीटरवरून जोरदार टीका केली होती. “वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं।” असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. तसेच “जून 2014 मध्ये भाजपाचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या 7 वर्षांत कच्चं तेल 30 डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. “2021 मध्ये 19 वेळा ही दरवाढ झाली आहे. म्हणजेच 45 दिवसांत 19 वेळा किंमत वाढली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे” हे सांगणारी आकडेवारी राहुल गांधी यांनी सादर केली होती.