मुक्तपीठ

छत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते ?

- दिलीप तिवारी

गेल्या४०० वर्षांच्याकाळखंडात सर्वाधिक लोकप्रिय चरित्र हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचे राहिले आहे. शेकडो अभ्यासक व तज्ञ मंडळींच्या लेखनातूनमहाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आले आहेत आणि येत आहेत. उपलब्ध बखरी, कागदपत्रे, आज्ञापत्रे यातील आशय वाचून शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण तर्काधारे केले जाते. या अगोदर केलेला तर्क वा मांडणी चुकीची होती असा दावा करीत नवा तर्क मांडला जातो. याच कारणामुळे संपूर्ण जगभरातील अभ्यासकांना भूरळ घालणारे व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराज यांचे आहे.

शिवचरित्राची नवी मांडणी करताना किंवा नवे तर्क लावताना प्रामुख्याने तीन मुद्दे उल्लेखले जातात. पहिला मुद्दा म्हणजे, स्वराज्य हे केवळ हिंदवी स्वराज्य नव्हते. तर ते सर्व समावेशक स्वराज्य होते. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवाजी महाराज मुसलमान द्वेष्टे नव्हते. त्यांच्या कारभारात अनेक मुसलमान चाकर होते. तिसरा मुद्दा म्हणजे, शिवाजी महाराजांचे खरे विरोधक ब्राह्मण होते. यापैकी तिसरा मुद्दा अलिकडे जास्त चर्चेत असतो.महाराजांच्या चाकरीत मुसलमान होते हा दावा करीत त्यांच्या नावांची यादी दिली जाते. त्याच वेळी शिवाजी महाराजांचे शत्रू ब्राह्मण होते हा तर्कमांडताना अफझलखानाचा चाकर म्हणजे वकील कृष्णाजी भास्करकुळकर्णीच्या नावापासून यादी तयार केली जाते. शिवाजी महाराज यांच्याअष्टप्रधान मंडळात सर्वाधिक ब्राह्मण कारभारी होते याचा उल्लेख टाळला जातो. कृष्णाजी हा अफझलखानाचा चाकर होता. शहाजी राजे भोसले यांनीही मोगलांच्या तीन बादशाहीत सुभेदार म्हणून जबाबदारी निभावली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिम चाकर होते तसेच दिल्लीतील औरंगजेब, विजापूरात आदिलशहा, गोवळकोंड्यात कुतुबशहा यांच्या दरबारात मुसलमानांसह मराठा चाकर, सरदार, सुभेदार व मनसबदार होते यावर फारसे भाष्य होत नाही. किंवा त्यांच्या नावांच्या यादीचा फारसा शोध घेतला जात नाही.

अर्थात, या लेखाचा हेतू शिवचरित्रातील समाज-जात या विषयी प्रवाद वा वाद निर्माण करणे हा मुळीच नाही. या लेखाचा हेतू शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील इतरही अनुल्लेखित प्रसंगांचा आढावा घेणे हा आहे. हा आढावा संकलन स्वरूपात आहे. त्यामुळे हा संशोधन लेख नाही.

मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला पुरंदरचा तह, त्यानंतर औरंगजेबच्या भेटीसाठी महाराज यांचे आग्र्यात आगमन, तेथे झालेली नजरकैद आणि नंतर तेथून महाराजांचे शिताफिने बाहेर पडणे अर्थात निसटणे. या घटनेला पलायन हा शब्द वापरणे चुकीचे आहे असा निष्कर्षही अलिकडे मांडला जातो. तो सुद्धा योग्य आहे. आग्र्यातील नजरकैदेतून निसटण्याचा बेत महाराज आणि तेथील सोबतच्या सहकाऱ्यांनी ठरवून आखला व तो अमलात आणला. म्हणून ती कृती विचारपूर्वक निसटण्याची ठरते. पळून जाणे याचे उदाहरण म्हणजे, शाहिस्तेखान हा जीव वाचवायला लाल महलातून पळाला होता. स्वतःच्या ध्यानीमनी नसताना जीव वाचवायला केलेली कृती म्हणजे पलायन.

शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले ? याविषयी आतापर्यंत पारंपरिक तर्क मांडला गेला आहे. तो म्हणजे, महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पहाऱ्यातून बाहेर पडले. हा निष्कर्ष राजस्थान दप्तरातील कागदपत्रातून निघतो. नजरकैदेतून शिवाजी राजे कसे निसटले ? हा प्रश्न औरंगजेबला पडलेला होता. मिर्झा राजे जयसिंह यांचा पुत्र रामसिंहच्या सैनिकांचा शिवाजी राजेंच्या भोवती पहारा होता. त्यामुळे शिवाजी राजे कसे निसटले याचे उत्तर त्यांना देणे भाग होते. तेव्हा तेथील सैनिकांनी तर्क केला की, शिवाजी राजे पेटाऱ्यात बसून निसटले. तशी कागदपत्रे राजस्थानच्या दप्तरात आढळतात. तेच पुरावे पेटऱ्यातून सुटका या तर्कासाठी वापरले गेले. मात्र पेटाऱ्यातून सुटका हा तर्क यापूर्वी काही अभ्यासकांनी नाकारला आहे. सभासद बखर, जेधे शकावली, खाफीखान, सुरतकर इंग्रज यांनी या पेटाऱ्यातून सुटका कथेस दुजोरा दिला आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांना हा तर्क मान्य नाही. आग्र्याहून निसटलेले शिवाजी महाराज पुढे मथुरेत गेल्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. त्याच घटनेतील काही तथ्यांचे संकलन या लेखात आहे.

लेखक डॉ. अजित प. जोशी यांचे  ‘आग्र्याहून सुटका’ या पुस्तकात (शिवप्रताप प्रकाशन) आग्रा घटनेची तर्काधारित मांडणी आहे. या पुस्तकात लेखकाने पेटाऱ्याची कथा आणि तिचा फोलपणा सिद्ध करणारे १२ मुद्दे मांडले आहेत. त्याचे सविस्तर विवेचन येथे करायचे नाही. शिवाजी महाराजांची यांचा औरंगजेबाच्या दरबारातील भेट १२ मे १६६६ ला झाली. त्यानंतर महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला नजरकैदेतून निसटले. त्यानंतर २५ सप्टेंबर १६६६ ला म्हणजे २५ दिवसांनी दक्षिणेत ७०० मैलांवरील राजगडाला पोहोचले. दक्षिणेत जाण्याआधी त्यांनी संभाजीला मथुरेत पोहोचवले. लेखकाने असाही तर्क मांडला आहे की, शिवाजी महाराज सिरोंज–हांडिया येथे नर्मदा ओलांडून पुढे चारवा, छानेरा, अशीरगढ करत बऱ्हाणपुरकडे निघाले. नंतर ते बहुधा जळगाव, एरंडोल, मालेगाव करीत चांदवडला साधारण ५ सप्टेंबरला पोहचले असावेत. महाराज चांदवडजवळ मनोहरगडावर थांबले. तेथून ते पुढे राजगडावर पोहचले. या तर्कात जळगावचे नाव घेतले गेले आहे.

शिवाजी महाराजांचा हा प्रवास कसा आणि किती दिवसांचा झाला असावा याविषयी सुद्धा तर्काधारे मांडणी केली जाते. याविषयी डॉ. अजित जोशी यांनी म्हटले आहे की, समकालीन राजस्थानी कागदपत्रात शिवाजी महाराज २५ दिवसांनी राजगडास पोहोचले असे नमूद केले आहे. अनेक इतिहासकारांनी महाराजांचा हा प्रवास आग्रा, मथुरा, अलाहाबाद, वाराणसी, गया, गोवळकोंडा, बिदर, गुलबर्गा, पंढरपूर, फलटण ते राजगड असा नोंदवला आहे. आहे. या मार्गाने आग्रा ते राजगड हे अंतर १५०० ते १७०० मैलांचे होते. त्या काळातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेतली तर हे अंतर अवघ्या २५ दिवसात पार करणे तसे अवघड दिसते. शिवचरित्रकार मेहेंदळे यांच्या तर्कानुसार महाराज मथुरेहून सरळ दक्षिणेकडे १ हजार मैलांचे अंतर २५ दिवसात कापून राजगडास पोहोचले असावेत. महाराजांच्या परतीचा मार्ग निश्चितपणे सांगणारा कोणताही पुरावा सध्या समोर नाही.

शिवाजी महाराज यांच्या परतीचा प्रवास आणि त्याला लागणारा दिवसांचा कालावधी याची मांडणी केवळ तर्कानुसार होत असताना मथुरा येथीलसाहित्यिक-सांस्कृतिक संस्था ‘जन सांस्कृतिक मंच’ चे अध्यक्ष आर. के.चतुर्वेदी यांनी थोडा वेगळा तर्क मांडला आहे. त्यांनी दावा केला आहे की, शिवाजी महाराज मथुरेत ४७ दिवस मुक्कामी होते. याला पुरावा म्हणून त्यांनी कोल्हापूर येथील पुरातत्त्व संरक्षण विभागात आढळलेल्या एका पत्राचा आधार घेतला आहे. कोल्हापुरातील अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांच्या मथुरा भेटीचा अभ्यास करण्यासाठी कोल्हापूर पुरातत्त्व संरक्षण विभागातील कागदपत्रे हाताळली. तेथे शिवाजी महाराजांची २५२ पत्रे आहेत. त्यात एक पत्र ३ ऑक्टोबर १६६६ ला मथुरा येथून महाराज यांनी लिहिलेले आहे. याच पत्रावरुन शिवाजी महाराजांच्या मथुरा निवासाचा नवा तर्क समोर येतो. या तर्काला जोडून चतुर्वेदी म्हणतात, ‘शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून वेषांतर करुन निघाले तेव्हा त्यांच्या पथकात एक चतुर्वेदी होता. त्याचे मथुरेत नाते संबंध होते. त्याच्याच संपर्कातून मथुरा येथे चौबिया पांडे यांच्या हाथीवाली गल्लीतील निवासात शिवाजी महाराज थांबले. याच चौबे यांचे वंशज महाराष्ट्रातील जळगावमध्ये (बहुधा नशिबाराबाद) येथे आहेत. शिवाजी महाराज मथुरेत मथुरा-वृंदावन आकाशवाणी जवळच्या गणेश किल्ल्यावरील मंदिरात साधू म्हणून राहिले का ? याचाही शोध घेत आहोत.’ शिवाजी महाराज यांच्या संबंधातूनच मथुरेत रामदास मंडी आहे. (संदर्भ १) परतीच्या प्रवासाचा कालावधी निश्चित होत नसल्यामुळे शिवाजी महाराज मथुरेत काही काळ थांबले हे चतुर्वेदी यांचे म्हणणे अजून तरी कोणी खोडून काढलेले नाही.

चतुर्वेदी यांचा दावा ज्या इंद्रजीत सावंत यांच्या अभ्यासावर आधारित आहे, त्यांनीही शिवाजी महाराज हे ४७ दिवस मथुरेत थांबले असावेत हा दावा केला आहे. इंद्रजीत सावंत हे सह्याद्री इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका ते राजगड या कालावधीत सत्यशोधनासाठी ६ वर्षे अभ्यास केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, शिवाजी  राजे आग्र्याहून निसटून राजगडावर २२ ते २५ दिवसात पोहचले अशी तर्काधारित मांडणी पूर्वी केली जात होती. मात्र, शिवाजी महाराज हे मथुरेत जवळपास ४७ दिवस थांबल्याचे आढळून येत आहे. सावंत यांनी शिवाजी विद्यापिठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांनी सन १९४५ मध्ये लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन संशोधन केले. कोल्हापूर येथील करवीर छत्रपतींचे कार्यालय आणि जुना राजवाडा येथे शिवाजी महाराजांच्या काळातील २५२ पत्रे आढळली आहेत. त्यात शिवाजी महाराज यांनी मथुरेतून ३ ऑक्टोबर १६६६ ला लिहिलेले पत्र आहे. म्हणजेच शिवाजी महाराज तेव्हा मथुरेत होते. अर्थ शिवाजी महाराज २२-२५ दिवसात राजगडावर पोहचले असावेत हा तर्क बाजुला ठेवावा लागतो. सावंत यांना गणेश खोडके (कोल्हापूर पुरातत्त्व संग्रहालयाचे प्रमुख) यांनी हे पत्र शोधून देण्यास मदत  केली.

सावंत यांनी शिवाजी महाराजांची ८ नवी पत्रे समोर आणली आहेत. (संदर्भ २)

उपरोक्त तर्काविषयी अजून स्पष्टीकरण आहे. वृंदावन मधील ब्रज संस्कृति शोध संस्थानमध्ये कवि कुलपति मिश्र रचित ‘सेवा दी वार’ या काव्य संग्रहाचे हस्तलिखित आढळले आहे. त्यात औरंगजेबाच्या कैदेतून महाराज कसे निसटले ? याचे वर्णन आहे. तिवारी यांनी सांगितले होते की, पं. उदय शंकर दुबे यांच्या मार्गदर्शनात संस्थेतील प्राचीन हस्तलिखितांची यादी तयार केली जात होती. तेव्हा मिश्र रचित ‘सेवा दी वार’ चे हस्तलिखित मिळाले. यात पंजाबी भाषेतील ४४ छंद आहेत. त्याची लिपी नागरी आहे. तिवारी यांनी पुढे म्हटले आहे की, कवि कुलपति मिश्र हे आमेर नरेश मिर्झा राजे जयसिंह यांचे पुत्र रामसिंह यांचे आश्रित होते. बहुधा महाराजांच्या आग्रा भेटी व नंतरच्या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी असावेत. या हस्तलिखिताचा काळखंड विक्रम संवत १८३० म्हणजे सन १७७३ येतो. या हस्तलिखिताला विश्वासार्ह म्हणता येईल असे पुणे येथील अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचे म्हणणे आहे. या काव्यानुसार आणि मैलांचे अंतर व प्रवासाचा कालावधी लक्षात घेतला तर शिवाजी महाराज दि. १७ ऑगस्ट १६६६ ला नजरकैदेतून निसटले आणि २० नोव्हेंबर १९६६ ला राजगडावर पोहचले हा कालावधी जवळपास ९० दिवसांचा होतो. त्यामुळेच शिवाजी महाराज काही काळ मथुरेत थांबले असावेत या तर्काला पुष्टी मिळते. (संदर्भ ३)

मथुरेत बाल संभाजी यांचा मुक्काम होता. तेथे त्यांनी ब्राह्मण बालकाचे रूप धारण केले होते. याचाही संदर्भ मिळतो. कवी कलश आणि संभाजी यांची मित्रता मथुरेतून होती असा तर्क आहे. रघुनात कोर्डे यांच्या मथुरेतील नातेवाईकाकडे संभाजी राजे काही काळ थांबले. ते ब्राह्मण आहेत असे भासावे म्हणून तेथे त्यांचा उपनयन संस्कारही केला गेला असे काही अभ्यासक म्हणतात. संभाजी यांनी तेथे संस्कृत पठण केले. बहुधा तेथेच त्यांच्यावर काव्य रचनेचा संस्कार झाला असावा. (संदर्भ ४) मात्र संभाजी यांनी काव्य रचले हा तर्क अलिकडे काही अभ्यासक खोडून काढतात.

वरील सर्व विवेचन लक्षात घेता शिवाजी महाराज हे मथुरेत थांबल्याचा दावा बहुअंशी योग्य वाटतो. जर महाराज येथे काही दिवस (४७ दिवस नाही) थांबले असे गृहीत धरले तर ते तेथे कोणाकडे थांबले असावेत ? हा प्रश्न समोर येतोच. तेव्हा इंद्रजीत सावंत व आर. के. चतुर्वेदी यांच्या तर्काकडे लक्ष जाते. चतुर्वेदी म्हणतात, शिवाजी महाराज हे चौबिया पांडे यांच्या निवासात राहिले. पांडे किंवा चौबे हे ब्राह्मण आहेत. आग्राजवळ असताना, औरंगजेबाच्या छळ व अन्यायाची भीती असतानाही शिवाजी महाराज मथुरेत काही काळ ब्राह्मणाच्या निवासस्थानी थांबले हा तर्क लक्षात घ्यायला हवा. जेव्हा शिवाजी महाराज यांचे शत्रू म्हणून ब्राह्मणांची यादी केली जाते तेव्हा त्यात शिवाजी महाराजांचा मथुरेतील मुक्काम कोणाकडे होता, बाल संभाजी यांना कोणी सांभाळले ? हे विषय मुद्दाम बाजूला ठेवले जातात.

शिवाजी महाराजांच्या कारभारात ब्राह्मण होते हे सत्य आहे. माणसे ओळखण्याची पारख महाराजांना होती. महाराज जेव्हा मोहिमांवर जात तेव्हा मुख्य प्रधान (पंतप्रधान) मोरेश्वर त्र्यंबकपंत पिंगळे यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असत. याशिवाय कारभारी मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, रामचंद्रपंत निळकंठ बहुलकर, दत्ताजीपंत मंत्री, रघुनाथ बल्लाळ अत्रे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव होते. न्यायाधिश निराजी रावजी हे नाशिककर ब्राह्मण होते. डबीर, कोरडे, अत्रे आणि बोकील हे महाराजांचे वकील ब्राह्मण होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेले गागा भट्ट हे मूळचे पैठणचे होते. त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. पंडित दिवाकर भट्ट यांचे ते पूत्र. गागाभट्ट यांचे खापर पणजोबा रामेश्वरशास्त्री भट्ट हे महाराष्ट्रातील सुलतानी अंमलाला कंटाळून काशीला जाऊन राहीले. इस्लामी सुलतानांनी काशीत उध्वस्त केलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिराची नव्याने उभारणी रामेश्वरशास्त्री भट्ट यांनी केली.  गागा भट्ट हे राज्याभिषेकाच्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले असे नाही. या आधी सन १६६४ मध्येही महाराजांशी राज्याभिषेकाच्या संदर्भात चर्चेसाठी ते आले होते. त्यावेळी शाहिस्तेखान पुण्याजवळ धुमाकूळ घालत होता. हा विषय गागा भट्ट यांनीच ‘शिवार्कोदय’ या ग्रंथात नमुद केला आहे.  (सदंर्भ ५)

विषय पुन्हा अफझलखानाच्या वधाचा येतो. अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुळकर्णी याने महाराजांवर वार केला हे जेव्हा सांगितले जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे ३८ नातेवाईक अफझलखानाच्याछावणीत खानाला साहाय्य करत होते हा उल्लेख केला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला अफझलखान आला त्या वेळी त्याच्या निवडक दहा संरक्षकांमध्ये मंबाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते हे महाराजांचे दोन चुलत सासरे होते. (संदर्भ ६)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button