गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरघुती सिलेंडर आता 769 रूपयांवरून 794 रुपयांवर पोहचली आहे.
चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आता 810 रुपये झाली आहे तर कोलकातामध्ये सर्वाधिक म्हणजे 820 रुपये झाली आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत एकूण 100 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. यामुळे मध्यमवर्गियांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी 50 रुपयांची वाढ केली होती. जानेवारीत या किंमतीत जरी कोणतीही वाढ झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर एकूण 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला सातत्याने महागाईला सामोरं जावं लागतंय.