केरॉन पोलार्डची तुफान फलंदाजी; 6 चेंडूवर 6 षटकार
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याआधीच मात्र एका स्टार फलंदाजाच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. त्यानं केलेल्या विक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे.
वेस्टइंडिजचा धुरंदर फलंदाज केरॉन पोलार्ड याने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 सामन्यात धुव्वा उडवला. आपल्या तुफान फलंदाजीमुळे सोशल मीडियावरच नाही तर जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यात त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारून मैदानात आपली दहशत निर्माण केली. केरॉन पोलार्डने श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरश: जेरीस आणलं. अँटिगा येथे खेळल्या गेलेल्या टी -20 सामन्यात कीरोन पोलार्डने 11 चेंडूत 38 धावांची स्फोटक खेळी केली आणि चर्चेचा विषय ठरला. केरॉन पोलार्डच्या या दमदार खेळीमध्ये 6 चेंडूत 6 षटकारांचा सामावेश आहे. त्याच्या तुफान फटकेबाजीमुळे श्रीलंकेचे गोलंदाजही काही क्षण बिथरले. केरॉन पोलार्डने श्रीलंकेचा गोलंदाज अकीला धनंजयच्या प्रत्येक चेंडूवर षटकार लगावला. यावेळी, केरॉन पोलार्डचा स्ट्राइक रेट 350 च्या जवळपास होता. पोलार्डने प्रत्येक चेंडूवर षटकार मारून युवराज सिंहसोबत बरोबरी केली आहे.
युवराजने 2007मध्ये टी 20 वर्ल्डकप सामन्यात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ड ब्रॉर्डच्या 6 चेंडूवर 6 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. पोलार्डच्या या कामगिरीनंतर सर्वांनाच त्या दिवसाची पुन्हा एकदा आठवण झाली. 14 वर्षांनंतर पोलार्डनं युवराज सिंहसोबत 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याच्या विक्रमात बरोबरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारे पोलार्ड जगात तिसरा खेळाडू ठरला आहे. युवराज सिंह त्यानंतर हर्षल गिब्स आणि त्यानंतर आता पोलार्डच्या नाव तिसऱ्या स्थानावर घेतलं जात आहे.