विजय हजारे करंडकावर मुंबईने कोरले चौथ्यांदा नाव
आदित्य तरेची शतकी खेळी, उत्तर प्रदेशवर ६ गाडी राखून विजय
नवी दिल्ली : आदित्य तरेच्या (Aditya Tare) शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडाकातील अंतिम सामन्यात (Vijay Hazare Trophy Final) उत्तर प्रदेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने चौथ्यांदा विजेतपद पटकावलं आहे. युपीने मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकडून आदित्य तरेने 118 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तर कर्णधार पृथ्वी शॉने 73 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने महत्वपूर्ण 42 धावा केल्या.
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या मुंबईची शानदार सुरुवात राहिली. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 89 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान पृथ्वीने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर मुंबईचा स्कोअर 89 असताना पृथ्वी बाद झाला. पृथ्वीने 39 चेंडूत 73 धावा चोपल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले.
पृथ्वी बाद झाल्यानंतर आदित्य तरे मैदानात आला. तरे आणि यशस्वीने धावफलक हलता ठेवला. मात्र 127 स्कोर असताना यशस्वी बाद झाला. यशस्वीने 29 रन्स केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर मुंबईचा स्कोअर 2 बाद 127 असा झाला होता. मात्र त्यानंतर शम्स मुलानीसह डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. शम्स मैदानात सेट झाला होता. अर्धशतक लगावण्याची त्याला संधी होती. मात्र शम्स 36 धावा करुन माघारी परतला.
आदित्य तरेचे शानदार शतक
शम्स बाद झाल्यानतंर ऑलराऊंडर शिवम दुबे मैदानात आला. शिवमसोबत आदित्यने चौथ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. या पार्टनरशीप दरम्यान आदित्यने 91 चेंडूच्या मदतीने 15 चौकारांसह पहिलंवहिलं शतक झळकावलं. शिवमही चांगल्या रंगात होता. शिवमने फटेकबाजी करण्याचा प्रयत्न केला. शिवम अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आला होता. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला. शिवमने 28 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 42 धावा चोपल्या. शिवमनंतर सरफराज खान मैदानात आला. सरफराजच्या मदतीने आदित्यने धावा केल्या. विजयासाठी काही धावांची आवश्यकता होती. तेव्हा आदित्यने विजयी फटका लगावला. यासह मुंबईने युपीवर 6 विकेट्सने विजय मिळवला.