राजकारण

एनएसयुआयच्या ‘नौकरी दो या डिग्री वापस लो’ या देशव्यापी अभियानाला सुरुवात

मोदी सरकार विरोधात देशातील युवा तरुणांच्या भावनांचा उद्रेक : भाई जगताप

मुंबई : प्रत्येक वर्षी दोन करोड रोजगार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असा जुमला बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना आकर्षित केले व देशातील तरुण सुद्धा आपल्याला नोकरी मिळेल या एका आशेने त्यांच्याबरोबर भरकटत गेले. पण आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सरकारी आकड्यानुसार देशातील १४ कोटी नोकऱ्या नष्ट झाल्या आहेत. एकही नोकरी वाढली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगीकरण्याच्या नावाखाली शाश्वत नोकऱ्या सुद्धा नष्ट करून टाकल्या आहेत. अनेक तरुण आपल्या असलेल्या नोकऱ्या गमावून बसले आहेत. आज लाखो विद्यार्थी दरवर्षी विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडतात, डिप्लोमा घेऊन बाहेर पडतात, कोर्सेस करून बाहेर पडतात. पण आज डिग्र्या घेऊन सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही. जुमलेबाजी मोदी सरकारने त्यांची फसवणूक केली आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारला जागे करण्यासाठी, त्यांना वास्तव दाखविण्यासाठी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय तर्फे ‘नौकरी दो, या डिग्री वापस लो’ हे देशव्यापी अभियान राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण देशात सुरु करण्यात आले आहे. दिल्लीत या अभियानाची सुरुवात झाली. आज हे अभियान आम्ही मुंबईत सुरु करत आहोत. हे अभियान म्हणजे केंद्रातील जुमलेबाज भाजप सरकारविरोधात देशातील युवा तरुणांच्या भावनांचा उद्रेक आहे, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान केले. आज एनएसयुआय व मुंबई काँग्रेसतर्फे ‘नौकरी दो या डिग्री वापस लो’ या देशव्यापी आंदोलनाची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. त्या वेळेस भाई जगताप बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी अमित सिंग टिमा, एनएसयुआयचे मुंबई अध्यक्ष प्रद्युमन यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, तसेच एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी या अभियानाच्या पोस्टरचे अनावरण केले.

भाई जगताप पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम बद्दल होते. पण त्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये किती तरुणांची स्किल डेव्हलप झाली? किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? किती व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला? याचा केंद्र सरकारकडे कुठेही तपशील नाही. आपल्या देशात कामगार विभागाची एक वेबसाईट फार पूर्वीपासून कार्यरत होती. त्याद्वारे देशात दरवर्षी किती नवीन रोजगार तयार होतो, किती लोकांना नवीन नोकऱ्या उपलब्ध झाला, याचा पूर्ण तपशील असायचा. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला दोन कोटी रोजगार देण्याचा जुमला खोटा ठरला, लोकांना नोकऱ्या मिळणे बंद झाले, देशातील तरुण रस्त्यावर आला, त्यावेळेस ती वेबसाईट बंद करण्यात आली. अशी लपवाछपवी करून देशातील बेरोजगार तरुणांना कधीही नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत व देशातील बेरोजगारी कधीच संपणार नाही. त्यासाठी जे धोरण लागते ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे बिलकुल नाही आहे. जर त्याच्याकडे तसे धोरण असते. तर देशाची अशी परिस्थिती आज झाली नसती.

एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी अमित सिंग टिमा या वेळेस बोलताना म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांकडे आज डिग्री आहे. पण त्यांना डिग्री असूनसुद्धा रोजगार मिळत नाही. केंद्रातील भाजप सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाही. या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हे ‘नौकरी दो या डिग्री वापस लो’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. हा नारा फक्त एनएसयुआयचा नाही तर देशातील त्या तमाम युवा नागरिकांचा आहे, ज्यांच्याकडे आज डिग्री असूनसुद्धा नोकरी नाही. जे बेरोजगार आहेत. हा त्यांचा आवाज आहे. जो आम्ही केंद्रातील भाजप सरकारपर्यंत पोहचवणार आहोत.

या अभियानाबाबत अधिक माहिती देताना एनएसयुआयचे मुंबई अध्यक्ष प्रद्युमन यादव म्हणाले की, या अभियानाअंतर्गत ज्या विद्यार्थ्याकडे डिग्री असूनसुद्धा नोकरी नाही, अशा विद्यार्थ्याने 7290800850 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, मिस्ड कॉल दिल्यानंतर त्याला एक लिंक पाठवली जाईल. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपली माहिती व आपल्या डिग्रीची सॉफ्टकॉपी त्यावर अपलोड करावी. अशा प्रकारे डिग्री असून सुद्धा जे तरुण बेरोजगार आहेत अशा विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करून तो आम्ही केंद्र सरकार च्या समक्ष ठेवणार आहोत व त्यांना जाब विचारणार आहोत. आम्ही त्यांना सांगणार आहोत की एक तर एवढ्या बेरोजगार तरुणांना नोकरी द्या किंवा त्यांची डिग्री तुम्ही परत घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button