आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या दिव्यांश सिंह पन्वरला कांस्यपदक
नवी दिल्ली : पुरुष १० मीटर एअर रायफलच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या दिव्यांश सिंह पन्वरने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताचे खाते उघडले. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये दिव्यांशने कांस्यपदकाची (ब्रॉन्झ) कमाई केली. शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीत दिव्यांशने ६२९.१ गुणांसह सहावा क्रमांक मिळवत आठ जणांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत त्याने २२८.१ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले. अमेरिकेच्या ल्युकास कोझेनस्कीला (२४९.८) सुवर्णपदक आणि हंगेरीच्या इस्तवान पेनीला (२४९.९) रौप्यपदक मिळवण्यात यश आले.
कोरोना लॉकडाऊननंतर पिस्तूल आणि रायफल नेमबाजांसाठी ही पहिलीच स्पर्धा आहे. ‘सामन्यात काय होते याचा जणू आम्हाला विसरच पडला होता. सुरुवातीला खूप दडपण वाटत होते. यापूर्वी मला असे कधीही झाले नव्हते. मात्र, या पदकामुळे माझा आत्मविश्वास आता वाढला आहे,’ असे १० मीटरएअर रायफलमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर दिव्यांश म्हणाला. तसेच दिव्यांशचा सहकारी अर्जुन बाबूताने आपल्या सिनियर वर्ल्डकपमधील पदार्पणात दमदार कामगिरी केली. अर्जुनने अंतिम फेरीत १८५.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.