मुक्तपीठ

आपचे गुजरात यश!

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

देशाची राजधानी असणार्‍या दिल्लीत आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता हाती घेतल्यावर दुसर्‍या टर्ममध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जो प्रगतीचा आलेख कामावर लक्ष देऊन उंचावून ठेवला आहे त्याचा फायदा या पक्षाला सध्या देशभर होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात आपने परवा मिळविलेले यश त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

गुजरातमधील महापालिकांच्या ज्या निवडणुका परवा झाल्या त्यात थेट सामना भाजप विरुद्ध काँग्रेस असा अपेक्षित असताना आपने काँग्रेस पक्षाचा पार सफाया करीत पहिल्याच निवडणुकीत जी मुसंडी मारली आहे, त्याचे सारे श्रेय अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी उभ्या केलेल्या दिल्ली मॉडेलला द्यावे लागेल.

आपल्या देशात एकापेक्षा एक अनुभवी आणि जुने, ताकदवान पक्ष आणि त्यांच्याकडे धुरंधर नेते असताना केवळ पाच-सहा वर्षाच्या नव्या पक्षाने आखलेली आणि राबवलेली निवडणूक व्यूहरचना यशस्वी होत असेल तर काँग्रेससारख्या शतकोत्तर पक्षाला ही अतिशय शरमेची बाब म्हटली पाहिजे*.
महापालिका निवडणुकांच्या वर्षभर अगोदर गुजरात प्रदेश आम आदमी पक्षाचे मुख्यालय सुरू झाले होते. एका वर्षाच्या काळात म्हणजे 365 दिवसात या पक्षाने कालबद्ध टप्पे आखत जे नियोजन केले, त्यातून गुजरातमध्ये वातावरण निर्माण होऊन आजच्या घडीला सुरत महापालिकेत 27 जागा पदरात पाडत विरोधी पक्षाची जबाबदारी पेलायला या पक्षाचे शिलेदार सज्ज झाले आहेत. इतर महापालिकांमध्ये आपच्या पदरात यश पडले नसले तरी दुसर्‍या क्रमांकावर आपल्या पक्षाला आणून ठेवण्यात केजरीवाल, सिसोदिया यशस्वी झाले आहेत.

सुरत हे गुजरातमधील प्रमुख व्यापार केंद्र आणि राष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या मनपात काँग्रेसचे एकेकाळी राज्य असायचे. गेल्या 15 वर्षात सत्ता गेली तर काँग्रेसला 90 पेक्षा कमी जागा कधी मिळाल्या नाहीत. असे असताना आपच्या एंट्रीनंतर या पक्षाला एकही जागा मिळवता न येणे हे काँग्रेसमधील नेमके कुणाचे अपयश आहे? काँग्रेस पक्षात परंपरा आहे. पराभव स्थानिक आणि विजय राष्ट्रीय नेत्यांच्या नावावर खपवला जातो. उद्या या पराभवाचे चिंतन झाल्यावर पराभवाचे खापर नेहमीप्रमाणे गुजरात काँग्रेस कमेटीवर फोडले जाईल. मात्र निवडणूक काळात जेव्हा अमित शहा, केजरीवाल अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते काय करीत होते? असा सवाल कुणाच्या डोक्यात येणार नाही, कदाचित यालाच काँग्रेसची कार्यपद्धती आणि निवडणूक रणनीती म्हणत असावेत.

गुजरात महापालिका निवडणुकांत सुरतमध्ये 27 जागा मिळविणार्‍या आपने प्रथमच मैदानात उतरुन 11 टक्के मतदान आपल्याकडे वळविण्यात मिळविलेले यश सत्ताधारी भाजपची झोप उडवणारे आहे. पुढील वर्षी होणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकांची महापालिका ही रंगीत तालीम होती. *एका वर्षांपूर्वी गुजरातमध्ये प्रवेश केलेला आप मतांच्या टक्केवारीत एवढी मजल मारीत असेल तर प्रत्यक्ष विधानसभेत त्यांची प्रगती कशी असेल हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नसावी एवढे ते स्पष्टपणे जाणवत आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनावरुन पाटीदार समाज भाजपकडून तुटून काँग्रेसच्या छत्रछायेत काहीकाळ राहिला.मात्र काँग्रेसला पाटीदार समाजाला सांभाळता आले नाही. सुरतमधील 25 जागांवर प्रभाव असणार्‍या या समुहाने केवळ 2 जागा मागितल्या. मात्र काँग्रेसने दिल्या नाहीत. परिणामी त्यांनी आपल्या बाजूने मतदान करुन काँग्रेसला चांगलाच धडा शिकविल्याचे दिसते. पायल पटेल ही 22 वर्षीय तरुणी आपची उमेदवार म्हणून सुरतमध्ये सर्वाधिक मते घेवून निवडून येणारी सर्वात कमी वयाची नगरसेविका ठरली आहे. आगामी काळात हीच तरुणाई आम आदमी पक्षाची विधानसभेत स्टार प्रचारक बनुन पक्षाला यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. *महाराष्ट्रातही दोनशेवर ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत आपने पायाबांधणी सुरु केली आहे. इथेही काँग्रेसवर तशी परिस्थिती येवू शकते*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button