राजकारण

आता धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा : पंकजा मुंडे

मंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खरा, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.

आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे असा नाराजीचा सूर आळवत पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित त्या मार्गानं होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्यातील वनमंत्रीपदी असणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्या धर्तीवर आता रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी उचलून धरल्याचं पाहायला मिळालं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता याची चौकशी व्हावी आणि पूजाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. संजय राठोड यांनी फार आधी पदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही असं म्हणत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला गेलाच पाहिजे हीच बाब त्यांनी उचलून धरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button