मुक्तपीठ

आंदोलनजीवी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन संज्ञा शोधून काढली- ‘आंदोलनजीवी’. विरोध केल्याखेरीज जगूच शकत नाही अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी त्यांना ‘आंदोलनजीवी’ हा शब्द राज्यसभेत वापरला. राज्यसभा अध्यक्षांच्या अभिभाषणावर केलेल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात पंतप्रधानांनी हा नवीन शब्द बहाल केला. त्यांनी या आंदोलकांचे वर्णन ‘परोपजीवी’ असेही केले.
मोदी यांनी राज्यसभेत वापरलेली भाषा तमाम आंदोलकांचा अवमान करणारी आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे अनेक जण असले, तरी शेतकरी आंदोलनाच प्रत्यक्ष शेतकरी सहभागी आहेत. काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाने वारंवार आंदोलन केले. तसेच अन्य कोणत्याही आंदोलनात भाजप सहभागी होत होता, त्यावेळी भाजपची संभावनाही आंदोलनजीवी करायची का, असा प्रश्‍न निर्माण होतो. मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्ममधील वादग्रस्त धोरणांना भारतभरातून विरोध होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि तीन कृषी कायदे यांना होणारे विरोध ही त्याची उदाहरणे आहेत. विरोधांचे रूपांतर अत्यंत स्वाभाविक पद्धतीने आंदोलनांमध्ये होत गेले असले, तरीही सरकारने या आंदोलनांना विरोधी पक्षांनी किंवा तथाकथित देशद्रोह्यांनी सरकारविरोधात केलेल्या कटाचे स्वरूप दिले आहे. मोदी म्हणतात, त्यात तथ्यांश नक्कीच आहे. आंदोलनजीवींचा हा समुदाय जेथे कोठे आंदोलन सुरू असते तेथे जातो, मग ते आंदोलन वकिलांचे असो, विद्यार्थ्यांचे असो किंवा कामगारांचे असो. हे कधी आघाडीवर असतात, तर कधी मागून पाठिंबा देतात. हे लोक आंदोलनांशिवाय जगूच शकत नाहीत. आपण अशा लोकांची ओळख पटवली पाहिजे आणि या लोकांपासून देशाचे रक्षण केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. भारतीय जनत पक्षही आता सत्ताधारी असला, तरी पूर्वी सर्व आंदोलनात सहभागी होत होता. मग त्यावेळी भाजपही आंदोलनाशिवाय जगू शकत नव्हता, असे म्हणायचे का? भारताला स्वातंत्र्य आंदोलनामुळेच मिळाले. आंदोलनाचे, चळवळीचे स्वरुप वेगवेगळे होते; परंतु त्यांचे ध्येय समान होते. त्या वेळी भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला नव्हता. त्याचा पितृपक्ष जनसंघाची स्थापना झाली होती; परंतु जनसंघाने आंदोलनापासून कायम दूर राहणे पसंत केले. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व काँग्रेसने केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने कसे हायजॅक केले, याला फार काळ झालेला नाही. एक बोट दुसर्‍याकडे दाखविताना चार बोटे आपल्याकडेच राहतात, याचे भान मोदी यांना राहिले नाही.
बहुतांशी शांततामय पद्धतीने चाललेल्या आंदोलनांची व आंदोलकांची प्रतिमा डागळणारी ही पंतप्रधानांनी टिप्पणी त्यांनी 1974 साली घेतलेल्या पवित्र्याच्या पारच विरुद्ध आहे. तेव्हा वयाच्या विशीत असलेल्या मोदी यांनी गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन केले होते. मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटवरील एक पेज या नवनिर्माण आंदोलनाला समर्पित आहे. या आंदोलनाचे वर्णन मोदी यांचा जनआंदोलनाशी पहिला परिचय असे करण्यात आले आहे. मोदी यांचा सामाजिक प्रश्‍नांवरील वैश्‍विक दृष्टिकोन यांतून व्यापक झाला.या आंदोलनाने मोदी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला हुद्दा मिळवून दिला. 1975 मध्ये त्यांची नियुक्ती गुजरातमधील लोकसंघर्ष समितीचे सरचिटणीस म्हणून झाली. ही चळवळ डिसेंबर 1973 मध्ये सुरू झाली. अहमदाबाद येथील एलडी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कँटीनमधील दरांविरोधातून सुरू केलेल्या निषेधांचे रूपांतर या आंदोलनात झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर केला, तेव्हा 1974 सालाच्या सुरुवातीला चळवळीचे लोण अन्य महाविद्यालयांमध्ये पोहोचले. यातून राज्यव्यापी संप, जाळपोळ, लुटालूट असे सगळे प्रकार लक्ष्य करून झाले. नवनिर्माण आंदोलनामुळे गुजरात सरकार पडले आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू झाले. मोदी यांनी तरुणाईला उद्देशून त्या वेळी लिहिलेला संदेश नंतर ‘संघर्ष मा गुजरात’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या संदेशात मोदी यांनी तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे व लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन केले होते. हा संदेश आजच्या आंदोलकांना मोलाचा सल्ला तर देतोच, शिवाय, पंतप्रधानांच्या आंदोलनांबाबतच्या मतात झालेला आमूलाग्र बदलही यातून स्पष्ट होतो. देशावर आज लबाडांचे व घोटाळाबाजांचे वर्चस्व आहे. तरुणांना भविष्यकाळात दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, अनैतिकता, भ्रष्टाचार व दमनशाहीला तोंड द्यावे लागणार आहे.
सध्या देशात ज्या पद्धतीने लोकशाहीचा नाश केला जात आहे आणि हुकूमशाहीची वाट मोकळी होत आहे, ती बघता तुमच्या वाट्याला माना खाली घातलेल्या मेंढरांचे आयुष्य येणार आहे. केंद्र सरकार 2014 सालापासून ज्या पद्धतीने आंदोलने दडपत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे, त्याकडे मोदी यांच्या या 1974 मधील संदेशाचा संदर्भ घेऊन पाहणे गरजेचे आहे. या आंदोलनाने बिहारमध्ये पकड घट्ट केल्यानंतर यात एक नवीन नेता सहभागी झाला. स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण किंवा जेपी. विद्यार्थ्यांनी त्यांना आपले नेतृत्व करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक पटलावर येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या आंदोलनावर स्वार होऊनच तत्कालीन जनता पक्षाने सत्ता मिळविली. काँग्रेसला कधीच सहन करावा लागला नाही असा विरोध, प्रक्षोभ व विध्वंस मोदी सहन करत आहेत, असा युक्तिवाद भाजप तसेच उजव्या संघटना कायम करतात; पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. आणीबाणी लादण्यामागे मोठी चिथावणी होती. याचे कदाचित समर्थन करता येणार नाहीत; मात्र आणीबाणीच्या पूर्वी इंदिरा गांधी यांना ज्या प्रमाणात विध्वंसक विरोध झाला, त्याच्या जवळपास जाणारा विरोधही गेल्या चार वर्षांत, काश्मीरचा अपवाद वगळता, मोदी सरकारला सहन करावा लागलेला नाही. शेतकरी आंदोलनाला आंदोलनजीवी म्हटल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या संदर्भात आपले मत मांडले. पंतप्रधानांचा आंदोलनजीवी हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही, या शब्दांतून आंदोलनवार जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हो उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला; पण शेतकरी हा कोणाताही जीवित नाही, तर मानवतेला जीवित ठेवणारा महत्वपुर्ण घटक आहे, त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे, असे म्हटले आहे. गेल्या ऐंशी दिवसांपासून गाजीपूर,दिल्ली बॉर्डरवर लाखोंच्या संख्येने शेतकरी केंद्र शासनाने लागू केलेल्या तिन्हीं कृषी कायद्याविरोधात आंदोलन आंदोलन करत आहे. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या या आंदोलनाविषयी केंद्र शासन अनुकूल नसल्याचे दिसून आल्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय अनेक खेळाडू,कलाकारांनी ट्विट केल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या विरुद्ध भारतीय कलाकार असा सामना रंगल्याचेही पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाच्या ट्विटला उत्तर देताना, अनेक बॉलीवूड कलाकार क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हा आमच्या देशात अंतर्गत विषय असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील पंतप्रधानांनी केलेल्या भाष्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते, त्यांना काय म्हणायचे हे आम्हाला या शब्दामुळे समजले, अशी टीका डॉ. कोल्हे यांनी केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम आंदोलनाचाच पर्याय निवडला होता, तरीसुद्धा या देशात आंदोलनजीवी हा शब्द पंतप्रधान कसा काय वापरू शकतात, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
– भाग वरखडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button