राजकारण

उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज; योगी आदित्यनाथ म्हणजे ढोंगीपणाचा कळस; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा भय़ंकर प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपा सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस, अशा शब्दांत राबडी देवी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राबडी देवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट आणि काही फोटो शेअर केले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज आहे. कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसांच्या वेशात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत, असं राबडी देवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या महिलेचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. यामध्ये महिलेने घडलेला प्रकार सांगितला आहे.

उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी लखीमपुर खीरीच्या पसगवा ब्लॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एक महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button