मुक्तपीठ

‘ब्रेक दी रुल्स’चा खेळ का?

- विक्रांत पाटील

व्यापाऱ्यांना मृत्यूच्या तांडवात कसला धंदा करायचाय? समाजातील प्रत्येक घटकाला हे सारे सहन करावे लागतेय, व्यापारी काही एकटे नाहीत. मग तेव्हा थाळ्या बडवणारे, दिवे पेटवणारे आता असा आततायीपणा का करताय? राजकारण्यांच्या हातचे बाहुले होऊन, नको त्या विषयात राजकारण खेळावे, अशी आजची स्थिती आहे का? लॉकडाऊन कोण जाहीर करतं, यावर तुमच्या भूमिका ठरणार का? संवेदनशील असाल तर आजूबाजूला जीव गमावत असलेली माणसे पाहा. तुम्हाला धंदा महत्त्वाचा वाटतोय; पण मग लोकांच्या जीवाचे मोल कुणाला?

केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात आता कोरोना स्थिती भीषण झाली आहे. आपल्या राज्यात प्रामाणिकपणे चाचण्या, रुग्ण, मृत्यू यांचे आकडे जाहीर होतात; इतर राज्ये ते दडवतात. मात्र, आता तिथले बिंग फुटतेय. लोकांचे जीव जाताहेत, हॉस्पिटलात बेड नाही, आयसीयू फुल्ल, व्हेंटिलेटर नाही, रेमेडेसिविर नाही, लस संपलीय … शवागारात जागा नाही, स्मशानात वेटींग आहे. आपल्याकडे नगर शहरात काल एकाचवेळी 42 चिता पेटल्या. आजूबाजूला अनेक परिचित मंडळी, तरुण यावेळी जीव गमावून बसले आहेत. बालकांना लागण होत आहे.

हा दुसऱ्या लाटेतील म्युटंट धोकेदायक आहे. अशा वेळी धंद्याचा आणि स्वतःचा, इतरांचा जीव वेठीस घालण्याचा अट्टाहास का? सर्वसामान्य माणूस नोकरी गमावून, बेरोजगार होऊन, शेतकरी नुकसान सोसून एखाद-दोन आठवड्यांची बेगमी करतात काहीतरी. तर मग एरव्ही नफा कमावणारे व्यापारी तर नक्कीच करू शकतात. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, यावेळी परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा भीषण आहे. मग गेल्यावेळी तुम्हाला घरात बसून राहणे जे राष्ट्रीय कर्तव्य वाटत होते, ते यावेळी नकोसे का वाटतेय? “ब्रेक दीं चेन”ऐवजी तुम्हाला “ब्रेक दी रुल्स”चा खेळ का मांडावासा वाटतोय. विकृत राजकारण करणारे नालायक काहीही शेण खावोत, कुणालाही फूस लावोत; पण मग समाजातील जबाबदार व्यापारी, व्यावसायिक घटक अशा राष्ट्रीय संकटात अशी भूमिका कशी घेऊ शकतो?

हा प्रश्न फक्त राज्यातच नाही. उलट आता गुजरातमध्ये तर हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले. त्यानंतर तिथे महाराष्ट्राच्या धर्तीवर संचारबंदी व इतर उपाययोजना करण्यात आल्या. दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातसुद्धा महाराष्ट्राच्या उपाययोजना लागू कराव्या लागल्या. किमान 9 राज्यांनी महाराष्ट्र मॉडेल आपल्या राज्यात लागू करून कोरोना रोखण्यासाठी पावले उचलली. मग महाराष्ट्र इतका आततायी आणि जीवावर उदार का होतोय? काही राजकारणी मंडळींनी तर निव्वळ “नौटंकी” सुरू आहे; पण हे “महाराष्ट्रद्रोही” का आपल्याला ठाउक नाहीत. लसीबाबत राज्यावर इतका मोठा अन्याय झाला तेव्हा या थयथयथाट करणाऱ्या नाच्यांच्या दाढा उठल्या नाहीत; तोंडाला मुंगसे लावून बसले. विकृत राजकारण्यांना त्यांचे नालायक खेळ करू द्यात. आपण आपले गाव, परिसर, शहर यात किती ओळखीची माणसे गमावून बसलोय, किती नातेवाईक मृत्यूच्या दाढेतून परत आलेत, याचे तर किमान आकलन करू शकतो. प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, की आपले गाव, शहरात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून धंदा करावा, अशी स्थिती आहे का? फक्त भारतात नाही, युरोपातसुद्धा अनेक निर्बंध आहेत. आपण भान राखून आपल्या जबाबदारीचे पालन करणार आहोत की नाही? जिवापेक्षा जर आपल्याला धंदा महत्त्वाचा वाटत असेल तर खुशाल नियम मोडा, खुशाल धंदा करा. एखादा जवळचा, परिचित माणूस खुल्या व्यवहारांमुळे लागण होऊन जीव गमावून बसेल तेव्हा आपल्या हाती पश्र्चातापाशिवाय काहीही नसेल. ईश्वर करो, ती वेळ कुणावर न येवो. कुणाच्याही घरात कुठली वाईट बातमी न येवो. घरात राहा, सुरक्षित राहा. थोडी तडजोड करून सहज जगता येते काही दिवस. आपले अस्तित्व कायम राहणे महत्त्वाचे, धंदा काय आज नाहीतर उद्या करायचाच आहे, होणारच आहे. जान है तो जहां हैं… सर सलामत तो पगडी पचास … आततायीपणा टाळा, आजूबाजूच्या स्थितीचा विवेकाने, संवेदनशीलपणे, सारासार विचार करून भूमिका घ्या. नालायक राजकारण्यांची फूस आणि चिथावणीला बळी पडू नका. आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button