नरेंद्र मोदींनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?
संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल

बुलडाणा : शिवसेनेचे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड यांनी काही वारकऱ्यांसोबत झालेल्या मांसाहाराच्या वादात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? असा सवाल गायकवाड यांनी वारकऱ्यांना केलाय. संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिला. यानंतर काही वारकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, आपल्या समर्थकांना कोरोनाशी झुंज देताना किमान अंडी आणि चिकन मटण खावं असं आवाहन केले होतं. यातून जीव वाचवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्रोटीन मिळेल असं ते म्हणाले होते. त्यानंतर काही लोकांनी ते आवाहन स्वतःच्या अंगावर घेऊन माझ्यावर टीका टिप्पणी सुरू केली. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये अंडे खायला दिल्या जातात. वसतिगृहात एक-दोन दिवस आड मुलांना मटण-चिकन शासनाच्या सक्तीने दिले जातात. सैन्याला देखील दोन वेळा नॉनव्हेज दिलं जातंय. यामुळे त्यांच्यामध्ये शत्रूंशी लढण्याची ताकद यायला पाहिजे. यामुळेच फौजींमध्ये कोरोनाचं प्रमाण नसल्यासारखं आहे.
मुस्लीम समाजामध्ये सुद्धा कोरोनानं मृत्यूचं प्रमाण अल्प आहे. कारण त्यांचे जेवण प्रोटीनयुक्त आहे. म्हणून आपल्या लोकांनी तसं जेवण केलं तर कदाचित त्यांच्यातही प्रमाण कमी होईल. याच्यामध्ये माझं चुकलं कुठं? असं बोलल्यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली गेलीय तर आज जे ७०-८० टक्के रुटीनमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झालाय? त्यांना तुम्ही धर्माच्या बाहेर हाकललं नाही, की त्यांना धर्मात ठेवणार नाही? असा सवाल त्यांनी केला. काही विशिष्ट सेलच्या लोकांनी आपल्या अंगावर ओढण्याचा जो काही प्रयत्न सुरू केलाय त्या विधानावर आजही मी ठाम असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.




