राजकारण

पश्चिम बंगाल : भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नंदीग्राममध्ये देशातील सर्वात मोठी लढत

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 291 उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता भाजपने आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदु अधिकारी मैदानात उतरणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 57 जणांच्या पहिल्या उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती भाजपचे सचिव अरुण सिंग यांनी दिली. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यादृष्टीने भाजपचे बडे नेते रणनीती आखत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बंगालमध्ये तळ ठोकून आहेत.

नंदीग्राममध्ये सर्वात मोठी लढाई
नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे. शुंभेदू अधिकारी हे ममतांसोबत होते, त्यावेळी हा तृणमूलचाही बालेकिल्ला समजला जात असे. मात्र आता शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी थेट लढत होणार आहे. देशातील सर्वात मोठी अशी ही लढाई असेल. नंदीग्राम आंदोलनाने ममतांना सत्तेच्या सिंहासनावर बसवलं. या आंदोलनात शुभेंदू अधिकारी नायक म्हणून उदयाला आले. आता तेच शुभेंदू अधिकारी 2021 च्या निवडणुकीत ममतांसोबत नाहीत. शुभेंदू हे TMC सोडून BJP मध्ये दाखल झाले आहेत. इतकंच नाही तर ममतांवर त्यांनी हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नंदिग्रामच्या मुद्द्यावरुन ममता सत्तेत आला, आता त्याच आंदोलनाचा नायक ममतांना विलन ठरवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचाही ममतांना पाठिंबा
शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी सांगितलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला. “शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

ममता बॅनर्जींनी मतदारसंघ बदलला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तृणमूल सुप्रिमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 294 पैकी 291 जागांवरील उमदेवारांची नावे घोषित केली आहेत. ममता बॅनर्जी यांनी तिकीट वाटप जाहीर करताना त्यांनी स्वत:चा मतदारसंघ बदलला असून त्या नंदिग्राममधून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारण्यासाठीच नंदिग्रामची निवड केल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 42 मुस्लिम उमदेवारांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे बंगालमध्ये एम फॅक्टरच चालणार असल्याचं चित्रं आहे.

नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन सत्तेत आल्या होत्या. 2007 मध्ये तत्कालिन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने सलीम ग्रुपला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी उभी करण्यास मान्यता दिली होती. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

27 जणांचे तिकीट कापलं
यावेळी ममता बॅनर्जी यांनी 27 जणांचे तिकीट कापलं आहे. तब्येत खराब असल्याने अर्थमंत्री अमित मित्रा निवडणूक लढणार नाहीत. पुर्णेंदू बसूही निवडणूक लढणार नाहीत. तर पार्थो चटोपाध्याय यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच 80 वर्षांवरील नेत्यांना तिकीट देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे 80 वर्षांवरील सर्वच नेत्यांची तिकिट कापण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button