राजकारण

मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य करा; विनायक मेटेंचा अल्टिमेटम

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होऊ न देण्याचा इशारा

बीड : येत्या ५ जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा ७ जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय. बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली.

अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. २०१४ ला सुद्धा जे आरक्षण दिलं तेही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केला. इतकंच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी ५ जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर ७ जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला.

काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केलीय. मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने ३ दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली. पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केलं नाही, अशी टीका करताना तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी मेटे यांनी केलीय.

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस (EWS – आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारनं आपल्याला ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असं आवाहनही मेटे यांनी केलंय. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहील. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभे राहतील, असं आवाहनही मेटे यांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button