संपूर्ण देश काही आठवडे लॉकडाऊन करण्याचा अमेरिकेचा सल्ला
वॉशिंग्टन : भारतातील कोरोना संकट पाहता संपुर्ण जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत आणि मदतीचा ओघही. पण अशातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनातील एक महत्वाच्या व्यक्तीने भारतातल्या कोरोना महामारीच्या संकटावर एक भाष्य केले आहे. तब्बल सात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनात मुख्य वैद्यकीय सल्लागार राहिलेल्या डॉ. अँथोनी एस फौसी यांनी भारताविषयी केलेले एक भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ. अँथोनी एस फौसी यांनी भारताला सल्ला देतानाच म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशच काही आठवडे का बंद करत नाही असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याचवेळी ब्रेक द चैनच्या कालावधीत काही दिवस घरीच थांबा आणि एकमेकांची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोणत्याच देशाला लॉकडाऊन आवडत नाही. पण काही आठवडे सगळ्या गोष्टी, व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचे सातत्याने वाढणारे संक्रमण रोखता येणे शक्य होईल असे ते म्हणाले. जागतिक पातळीवर आरोग्याच्या बाबतीत ज्यांचा सल्ला मानला जातो अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. अँथोनी एस फौसी आहेत. या ब्रेक द चैनच्या माध्यमातून कोरोना संक्रमण रोखण्याचा एक आशेचा मार्ग नक्कीच निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या पावलामुळे देशाच्या यंत्रणेलाही काही तत्काळ, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन अशी पावले घेण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कदाचित अशा कठीण आणि मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग यातून नक्कीच निघेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भारतात सध्या कठीण परिस्थिती आहे. भारतात सध्या अनेक गोष्टींची नितांत अशी गरज आहे. मी एक सीएनएनचा व्हिडिओ पाहिला त्यामधून अनेक गोष्टी मला निदर्शनास आल्या. त्यामुळेच जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला शक्यप्राय अशा सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात असेही ते म्हणाले. अनेक गोष्टी नियोजनबद्ध अशा पद्धतीने करण्याची गरज सध्या भारताला आहे. सगळ्याच गोष्टी संकटाच्या गटात टाकून जमणार नाही. अनेक लोक आपले वडिल, आई, भाऊ, बहीण अशा सर्वांना रस्त्यावर ऑक्सिजनच्या शोधात घेऊन वणवण फिरत आहेत असेही माझ्या कानावर आले. यामधून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे यामध्ये कोणतेही केंद्रीय पातळीवरील असे नियोजन नाही. समन्वयाने या गोष्टी करता आल्या असत्या असेही ते म्हणाले.
तातडीने कोणत्या गोष्टी करता येतील यासाठी भारताचे प्राधान्य असायला हवे. येत्या दोन आठवड्यात भारतात काय करू शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे ही गोष्ट शक्यप्राय आहे. यामुळे लगेच सगळ संकट संपणार नाही. कारण अनेकांना ऑक्सिजन, बेड, वैद्यकीय सुविधा अशा गोष्टींची गरज आहे. आज तुम्ही लसीकरण कराल तर तत्काळ या संकटावर मात करता येणार नाही. पण यापुढच्या कालावधीत आणखी लोक आजारी पडण्यापासून तुम्ही या उपाययोजनांमुळे नक्कीच अनेक प्राण वाचवू शकता. त्यासाठी भारताला एखादे कमिशन किंवा एमर्जन्सी ग्रुप तयार करावा लागेल. ज्या माध्यमातून देशात वैद्यकीय गोष्टींची पुर्तता आणि पुरवठा सुरळीत होणे शक्य होईल. संयुक्त राष्ट्राशी संलग्न देशही यामध्ये मदत करू शकतील.